आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूच्या सोबतीला कावीळ! नागरिकांनो, आरोग्य सांभाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - डेंग्यूपाठोपाठकावीळच्या रुग्णांच्या संख्येतही गेल्या १५ दिवसांत झपाट्याने वाढ झाली आहे. शहरात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे एरव्ही दोन ते तीन टक्क्यांवर असलेले कावीळच्या रुग्णांचे प्रमाण १५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
डेंग्यूच्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत असतानाच आता शहरात कावीळ आणि डायरियाच्या आजाराने डोके वर काढले आहे. सध्या व्हायरल इन्फेक्शन आणि फ्लूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने शहरातील १५ पॅथॉलॉजी लॅबमध्ये विचारणा केली असता वेगवेगळ्या साथीच्या आजारांमुळे रक्ताचे नमुने तपासणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे, असे सांगण्यात आले. तसेच शहरात कावीळच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे सर्वच पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सध्या ती काहीअंशी कमी झाल्याचेही लॅबकडून सांगण्यात आले. शहरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचाही पुरवठा वाढला आहे. त्यातच अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावले असून महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कावीळ आणि अतिसाराची लागण लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. हा जंतुसंसर्ग दूषित पाण्यामुळे होते.

ही घ्या काळजी
* स्वच्छता ठेवावी.
* पिण्याचे पाणी शुद्ध स्वच्छ असावे.
* अन्नपदार्थ झाकून ठेवावेत.
* फळे भाज्या धुवून घ्याव्यात.
* विनाकारण इंजेक्शन सलाइन टाळावी.

कावीळची लक्षणे
* डोळे, त्वचा, नखे चेहरा पिवळ्या रंगाचा होतो.
* मल-मूत्राचा रंग लाल-पिवळा होतो.
* शरीराचा दाह होतो.
* चव राहत नाही.
* भूक लागत नाही, अन्नपचन होत नाही.
* थकवा जाणवतो.
* अंग गळून गेल्यासारखे वाटते.
५५ टक्के : फ्लू अन्य व्हायरल
१५ टक्के : मलेरिया
१५ टक्के : कावीळ डायरिया
१० टक्के : टायफॉइड
०५ टक्के : डेंग्यू