आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुशल मनुष्यबळानेच प्रगती : उपराष्‍ट्रपती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘येणा-या काही दशकांत जागतिक पातळीवर कोणत्याही राष्‍ट्राचे वैश्विक व नैतिक स्थान सैनिकी शक्तीवर नव्हे, तर विकसित विज्ञान तंत्रज्ञातील योगदान आणि कौशल्य असलेल्या मनुष्यबळावरच ठरणार आहे. याचे भान विद्यापीठांनी ठेवण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन भारताचे उपराष्‍ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले.


जळगावातील उत्तर महाराष्‍ट्रविद्यापीठाचा एकविसावा पदवीप्रदान समारंभ मंगळवारी झाला. या वेळी दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती के. शंकरनारायणन होते. या वेळी हरित क्रांतीचे जनक पद्मविभूषण प्रा. एस.एस. स्वामिनाथन यांना डॉक्टर आॅफ लेटर्स पदवीने सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव देवकर, कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम, कुलसचिव डॉ.ए.एम. महाजन, प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ.ए.यू. बोरसे उपस्थित होते.


उपराष्‍ट्रपती म्हणाले की, आर्थिक व सामाजिक विकासासाठी ज्ञान आणि कौशल्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि ज्ञान सातत्याने अद्यायावत करणे गरजेचे आहे. त्याचा संबंध गुणवत्तापूर्ण रोजगाराशी आहे. 2020 पर्यंत 560 लाख प्रशिक्षित मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार आहे. भौगोलिक रचनेचा लाभांश हा आपल्याला उत्पादनाच्या सीमारेषा वाढवण्यासाठी आणि जगाला भारताचे कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी उपयोगाचा आहे. कृषी क्षेत्राकडून उत्पादन आणि सेवा क्षेत्राकडे लोक वळू लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले.


पाणी सुरक्षितेसाठी कार्यक्रम घ्यावे : स्वामिनाथन
महाराष्‍ट्रात नेहमीच दुष्काळ पडतो. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांची सजग राहुन शाश्वत पाणी सुरक्षेसाठी कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत. राज्यात जे भुजल साठे सुरक्षित आहेत त्यांना अभय दिले गेले पाहिजे. अत्यावश्यक तेव्हाच पाण्याचा उपयोग केला गेला पाहिजे. ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाण्याच्या एका थेंबावर पिकाचे अधिक उत्पन्न कसे घेता येईल याचे धोरण आखावे. विद्यापीठांनी जैविक साक्षरता मोहिम राबवुन लोकांना त्याचे फायदे व धोके समाजवून सांगितले पाहिजे, असे आवाहन प्रा. स्वामिनाथन यांनी केले.