आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात 250 जणांना क्षयरोगाची लागण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - नागरिकांचे क्षयरोगाबाबत असलेले अज्ञान आणि अनास्था या कारणामुळे शहरात क्षयाच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. सध्या शहरात 250 क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच सर्वसाधारण क्षयरोगाच्या औषधींना प्रतिसाद न देणार्‍या एमडीआर टीबीच्या रुग्णांसाठी नवीन औषधोपचार सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या नवीन प्रणालीनुसार क्षयरोग असलेल्या एका रुग्णास दोन लाखांपर्यंतची औषधी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
क्षयरोगासंदर्भात एमडीआर टीबीच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ धोकादायक आहे. यावर पर्याय म्हणून शासनाने डॉट प्लस ही उपचार पद्धती जानेवारी 2012 पासून सुरू केली आहे. त्यात सुधारणा करून येत्या काळात प्रचार-प्रसारावर विशेष भर देण्यात येणार आहे. यात दोन पद्धतीने रुग्णांची तपासणी करण्यात येऊन उपचार करण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात चौथ्या महिन्याची थुंकी संसर्ग आढळलेल्या रुग्णांना उपचार सुरू करण्यात येणार आहे. तसेच दुसर्‍या टप्प्यात रुग्णांच्या नातेवाइकांची थुंकीची तपासणी करण्यात येणार आहे. थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील इंटिग्रेटेड रेफरन्स लायब्ररी येथे पाठविण्यात येणार आहे.
दोन लाख रुपयांपर्यंतची औषधे मिळणार मोफत - क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी सध्या 27 महिन्यांचा औषधोपचार शासनाकडून मोफत देण्यात येणार आहे. यापूर्वी डॉट या औषधोपचार प्रणालीनुसार रुग्णाला चार हजारांपर्यंतची औषधी देण्यात होती. मात्र यात अनेक रुग्ण अध्र्यातून उपचार सोडण्याचा प्रकार होत होता. त्यामुळे सर्वसाधारण क्षयरोग हा मल्टी ड्रग रजिस्टर टीबीमध्ये परावर्तित होण्याचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले होते. यावर पर्याय म्हणून शासनाने नवीन सुधारित डॉट प्लस प्रणाली सुरू केली आहे. यात नाशिक येथून औषधे आणावी लागणार आहेत. संशयित रुग्णास नाशिक येथे जाण्या-येण्याचा खर्चदेखील शासनाकडून देण्यात येणार आहे. रुग्णास 27 महिन्यांपर्यंत दोन लाख रुपयांपर्यंतची औषधी मोफत देण्यात येणार आहे. ही औषधी रुग्णास जवळच्या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान या योजनेचा असंख्य गरीब रुग्णांना फायदा होणार आहे. याशिवाय उपचार करणेही सोपे होणार आहे.
रुग्णांची संख्या वाढली - शहरात गेल्या काही दिवसांत एमडीआर टीबीच्या पाच संशयित रुग्णांची थुंकी तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. त्यापैकी एका रुग्णाला क्षयरोग आढळून आला आहे. तर चार रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सामान्य क्षयरोगाच्या 250 रुग्णांवर शहरात औषधोपचार सुरू आहे. यापैकी 199 रुग्ण हे नव्याने क्षयरोगाचे शिकार झालेले आहेत. तर 51 रुग्णांनी यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतला होता. मात्र पथ्य न पाळल्याने ते पुन्हा क्षयरोगाचे शिकार झाले आहेत. त्या सर्व रुग्णांना जिल्हा क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या क्षयरुग्णांसाठी शासनाने मोफत औषधोपचार सुरू केले आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे. मात्र, बहुतेक रुग्ण त्यासंदर्भात टाळाटाळ करत असतात. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. महेश मोरे, क्षयरोग नियंत्रण अधिकारी