आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे : पाणी द्या; जिल्हाधिकारी, पाणी द्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - वाढत्या उन्हासोबत टंचाईची तीव्रताही वाढत आहे. त्यामुळे गावागावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे व शिंदखेड्यासह अमळनेर तालुक्यातील गावांमध्येही पाणीप्रश्न बिकट बनला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार प्रा.शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांना ग्रामस्थ व शिवसैनिकांनी चार तास त्यांच्या दालनात घेराव घालून ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, चर्चेनंतर उद्या (दि.13) अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाचे पाणी पांझरा नदीत सोडावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून पांझराकाठच्या गावांतील लोकांकडून केली जात आहे. त्यासाठी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेर, कुसुंबा, वलवाडी, बिलाडी, न्याहळोद आणि इतर गावांतील शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, पंचायत समिती सभापती कैलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रा. अरविंद जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुधीर जाधव, महिला आघाडीच्या ज्योत्स्ना मुंदडा, भूपेंद्र लहामगे, हेमंत साळुंखे, चंदन पाटील, नगरसेवक प्रदीप कर्पे, तालुकाप्रमुख मनीष जोशी, दिलीप पाटील यांच्यासह वलवाडी, बिलाडी, नेरसह विविध गावांतील ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शिष्टमंडळाने अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी सोडण्याची मागणी केली. याबाबत आमदारांच्या मागणीवरून सचिवांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठवलेले पत्रही दिले. जोपर्यंत अक्कलपाड्यातून पांझरेत पाणी सोडण्याच्या आदेशावर जिल्हाधिकारी स्वाक्षरी करत नाही, तोपर्यंत दालनातच बसून राहण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. दरम्यान, नेहमीप्रमाणे शिष्टमंडळ निवेदन देऊन निघून जाईल, असे वाटल्याने जिल्हाधिकार्‍यांनी हा विषय फारसा गांभीर्याने घेतला नाही; परंतु उपस्थितांनी जिल्हाधिकार्‍यांच्या टेबलसमोरच ठिय्या मांडला. तसेच ‘पाणी द्या, पाणी द्या; जिल्हाधिकारी, पाणी द्या; दया करा, दया करा’ अशा घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे अखेर जिल्हाधिकार्‍यांनी फोनाफोनी करण्यास सुरुवात केली. अखेर चार तासांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पाटबंधारे विभागाला पत्र दिले आणि आंदोलन मागे घेण्यात आले.


काय घडले जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात?
अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी महाजन यांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला होता. हे आंदोलन म्हणजे केवळ र्शेय घेण्याची धडपड असल्याचा दावा धुळे तालुका कॉँग्रेस कमिटीने केला आहे. जिल्हाधिकार्‍यांना दोन दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनानंतरच पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता, असे पत्रक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष देवरे, किसान कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर गर्दे, जवाहर सूतगिरणीचे अध्यक्ष कुणाल पाटील, बाजार समिती सभापती कोतेकर, उपसभापती प्रताप देवरे, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष माळी, उपाध्यक्ष डॉ.परदेशी, दूध संघाचे अध्यक्ष गुणवंत देवरे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, डॉ.गिरासे, भगवान गर्दे, साहेबराव खैरनार, विजय पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. तालुका कॉँग्रेस कमिटीने दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकार्‍यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. तसेच कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिल्यानंतर पाणी सोडले जाणार होते, असेही कॉँग्रेसचे म्हणणे आहे.


टक्केवारीचा आरोप..
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांवर टक्केवारीचा आरोप करण्यात आला. तसेच पाण्याबाबत राजकारण केले जाणार नाही, असे सांगणारेच निधी येऊनही वर्क ऑर्डर काढत नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले. केवळ टक्केवारीची कामे जिल्हा परिषदेत होत आहेत, असा आरोपही केला. त्यामुळे त्यांच्याकडे मोर्चे येतील तेव्हाच ते काम करतील. त्यांचा भंडाफोड करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नये, असा इशारा याप्रसंगी आमदारांकडून देण्यात आला.आमदार प्रा. शरद पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांना चार तास घेराव
पाणी सोडण्याचा निर्णय आधीच झाला होता सुभाष देवरे


आमदारांनी केली होती मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
यंदाचा भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईची समस्या पाहता पांझरा नदीकाठावरील साक्रीचे आमदार योगेश भोये, धुळे ग्रामीणचे आमदार प्रा.शरद पाटील, शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल व अमळनेरचे आमदार साहेबराव पाटील यांनी संयुक्तपणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना अक्कलपाड्यातून पांझरा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सचिवांमार्फत जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेण्याचे सूचित केले होते.


शनिवारी सोडणार पाणी..
चार तासांचे आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांनी फोनद्वारे वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर अखेर उद्या (दि.13) पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना पत्र पाठवले. शनिवारी (दि.13)सकाळी पाटबंधारे विभागाकडून सर्व प्रकारची पूर्तता करण्यात येऊन पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनाच्या सांगताप्रसंगी आमदारांनी दिली.