आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण : धुळ्यातील गरुड संकुलात बळकावल्या जागा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील गरुड संकुलात व्यावसायिकांना देण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये व त्याबाहेर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. लिफ्ट आणि शौचालयासाठी असलेली जागाही बळकावण्यात आली आहे. एका व्यावसायिकाने तर मध्यवर्ती ठिकाणी भिंत बांधून सरकारी जागेला खासगी जागा ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ गाळ्यांतर्गत सजावटीला मान्यता असताना गाळ्याबाहेर मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले आहे. मात्र, याबाबत जिल्हाधिकारी किंवा क्रीडा विभागही लक्ष देताना दिसत नाही. या सर्व प्रकारातून क्रीडाधिकारी विभागाशी असलेले सलोख्याचे संबंध पुढे येत आहेत.

शहरातील मध्यवर्ती भागात क्रीडा विकासासाठी बांधण्यात आलेल्या संकुलात क्रीडा विकासाला हरताळ फासत व्यावसायिकांचा तसेच अधिका-यांचा आर्थिक विकासावर भर असल्याचे चित्र ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून पुढे आले आहे. गरुड संकुलात व्यावसायिकांसाठी भाडेतत्त्वाने गाळे देण्यात आले आहेत. या वेळी गाळेधारकांनी प्रशासनासोबत केलेल्या करारात कोणताच गाळेधारक आपल्या जागेव्यतिरिक्त इतर जागेचा वापर करणार नाही, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, संकुलात बहुतांश गाळेधारकांनी अनधिकृतपणे जागा बळाकावली आहे. शौचालयासाठी असलेली जागाही बळकावण्यात व्यावसायिक मागे राहिलेले नाहीत. काही व्यावसायिकांनी रिकाम्या गाळयांमध्ये आपले एसी बसविले आहेत. तर काही व्यावसायिकांनी चक्क कॅम्पसमधील जागेवर भिंत बांधलेली आहे. मात्र, या सर्व अतिक्रमणाकडे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने दुर्लक्ष केलेले आहे. त्यामागे मोठे अर्थकारण असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. जिल्हा क्रीडा समितीचे प्रमुख म्हणून या गैरप्रकाराकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आता पुढे येत आहे. अंतर्गत सजावटीला प्रशासनाने मान्यता दिली आहे. मात्र, गाळयांबाहेर जास्तीच्या जागा व्यापून त्यावर सजावट करण्याच्या बहाण्याने अतिक्रमण झाले आहे. काहींनी तर गाळयांची तोडफोड केली आहे. त्याचबरोबर मजलेही काढण्याचा प्रयत्न काही जणांनी केल्याचे दिसते.

जागेसाठी फिरली फाइल
क्रीडा संकुलात चार जिने आहेत. त्यापैकी दोन जिन्यांच्या शेजारी लिफ्टसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. त्या आरक्षित जागेवर सध्या कार्यालय सुरू आहे. क्रीडाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या प्रस्तावानुसार ही जागा जिल्हाधिका-यांनी मंजूर केली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. जागेचा गैरवापर थांबेल म्हणून कार्यालय सुरू करण्याच्या परवानगीची फाइल खुरपुडे यांच्यामार्फत सादर झाली. प्रशासनाने नियमावली धाब्यावर बसवत लिफ्टच्या जागेवर कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली.
व्यावसायिकांशी संधान
गरुड संकुलात कराराचे उल्लंघन करीत गाळेधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. ही बाब जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील अधिका-यांना ज्ञात आहे. मात्र, याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामागे मोठे अर्थकारण असल्याचे या संकुलातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दर महिन्याला क्रीडाधिकारी कार्यालयातील कर्मचारी या संकुलात दाखल होतात. तसेच ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून जागा बळकावली आहे. त्यांच्याकडून 500 ते 1000 रुपये दरमहा घेत अतिक्रमणाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष होत आहे.

- क्रीडा संकुलात जिन्याशेजारील गाळयांचा गैरवापर थांबविण्यासाठी कार्यालय बांधण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडाधिका-यांनी प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान इतर कोणत्या गाळयात व्यावसायिक अतिक्रमण निदर्शनास आले तर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
विठ्ठल सोनवणे, प्रांताधिकारी