आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकर्स झोनसाठी जागांचे पर्याय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील हॉकर्सचा प्रश्न सोडविण्यासाठी पर्यायी जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी देवपुरातील नवरंग जलकुंभाजवळील मोकळ्या जागेवर आणि साक्री रस्त्यावरील महापालिका शाळा क्रमांक 14 येथील जागा दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. हॉकर्स समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हॉकर्सबाबत विविध निर्णय घेण्यात आले.

हॉकर्स समितीची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली. आग्रारोडवर फेरीवाले दाटीवाटीने व्यवसाय करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे रस्त्यावरील फेरीवाल्यांना पर्यायी जागा दिली जावी, याबाबत चर्च करण्यात आली. अध्यक्षस्थानी आयुक्त दौलतखान पठाण होते. या वेळी समिती सदस्य नितीन बंग यांनी हॉकर्स समितीच्या बैठकीतून कृती होणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले.

देवपूर परिसराचा विचार केला तर त्या भागातील फेरीवाल्यांना नवरंग जलकुंभाजवळील महापालिकेच्या मालकीच्या जागेवर मोठे पत्र्याचे शेड उभारून पालिका बाजार उभारला जाईल. तेथे लहान भाजीपाला व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आयुक्त दौलतखान पठाण यांनी दिली आहे. या बाजारात सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. तेथे पाणी, कचरा उचलण्याची सुविधा, लाइट, रेस्टॉरंट, मेडिकल दुकान, पोलिस चौकी आणि वॉचमनसाठी खोली बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एक छोटा हॉलही बांधण्यात येणार आहे. या बाजारात फेरीवाल्यांना सामावून घेतले जाईल. त्याचप्रमाणे साक्री रस्त्यावरील महापालिकेच्या शाळा क्रमांक 14 मधील जागेवर साक्री रस्त्यावरील हॉकर्ससाठी जागा उपलब्ध करता येणार आहे. त्यानुसार येथे हॉकर्स झोन निर्माण क रून तेथे महापालिकेतर्फे सुविधा देण्यात येणार आहे. या दोन जागांबाबत समितीने निर्णय घेतला आहे. आता हा विषय महापालिकेच्या महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे. तर बारापत्थर भागातील सिमेंट जलकुंभाशेजारील रस्त्यावरील जागा देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

स्कायवॉक व्यावहारिकदृष्ट्या अडचणीचा ठरण्याची शक्यता
हॉकर्स समितीत स्कायवॉकचे संगणकावर सादरीकरणानंतर समितीतील सदस्यांनी त्यातील तांत्रिक अडचणीच्या बाजू मांडल्या. यात आग्रा रस्ता हा मुख्य रस्ता असल्याने वाहतूक मोठी आहे. त्यात या रस्त्यावरून वर्षभर विविध सण, उत्सवांच्या मिरवणुका, रॅल्या काढण्यात येतात. स्कायवॉक झाल्यावर दोन्ही रस्ते हे 16 फुटांचे होतील. त्यामुळे पुन्हा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी जास्त रु ंदी असलेला व कमी वाहतूक असलेल्या रस्त्यावर ते करता येऊ शकते. शिवाय खर्चाचाही प्रश्न आहेच.

‘दिव्य मराठी’च्या संकल्पावर झाली चर्चा
शहरातील आग्रा रस्त्यावरील फेरीवाल्यांसाठी हाग-या नाल्यावर रॅम्प टाकून तेथे जागा उपलब्ध करून देण्याचा विषय समितीच्या बैठकीत झाला होता. त्यावर ‘दिव्य मराठी’ने संकल्प चित्र सादर केले होते, अशी माहिती दिली. त्याप्रमाणे येथे हा झोन होऊ शकतो, असे सांगितले. येथे स्लॅब टाकण्यात येणार आहे. मात्र, त्यामुळे नाला स्वच्छ करण्यास अडचणीचा मुद्दा पुढे आल्यावर तेथील रॅम्प किंवा स्लॅब उंच करण्याचे नितीन बंग यांनी सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर 500 फुटांचा रॅम्प टाकून फेरीवाल्यांना येथे जागा द्यावी, असेही ते म्हणाले.

शहरातील आग्रा रस्ता हा 40 फुटांचा आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात. त्यासाठी मध्यभागी स्कायवॉक उभारण्यात यावा, अशी संकल्पना पॉवर पॉइंटद्वारे हॉकर्स समितीच्या बैठकीत मनसेचे कैलास कदम यांनी मांडली. यात त्यांनी मध्यभागी बीम ओतून त्यावर वीस फुटांचा प्लॅटफॉर्म उभारण्यात यावा. तेथे फेरीवाल्यांना जागा उपलब्ध होईल व स्कायवॉक खाली वाहने लावता येतील. यातून फेरीवाले आणि पार्किंग दोन्ही समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.