आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील एकवीरादेवी, बळसाणे तीर्थक्षेत्र जगाच्या पर्यटन नकाशावर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शहर परिसरातील एकवीरादेवी, पेडकाईदेवी, बळसाणे तीर्थक्षेत्र, पांझरा नदी परिसर, लळिंग, डेडरगाव, नकाणे, हरणमाळ या सर्व स्थळांचा विकास प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत झाल्यास त्यांना जगाच्या पर्यटन नकाशावर स्थान मिळणे शक्य आहे, असे मत केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या स्टेट लेव्हल मॅनेजमेंट एजन्सीचे सल्लागार आकाश गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. या वेळी शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

गुप्ता यांनी सांगितले की, देशभरात सुरू असलेल्या वेगवेगळया चार राज्यांमधील पर्यटनस्थळ विकासाच्या मंजूर प्रस्तावांच्या सर्वेक्षणाचे काम स्टेट लेव्हल प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे. त्यानिमित्त ते शहर परिसरातील सहा आणि जिल्ह्यातील पाच अशा 11 मंजूर प्रस्तावांचे सर्वेक्षण करून अहवाल केंद्र शासनाला सादर करणार आहेत. या अहवालासोबत प्रत्येक जागेचे क्षेत्र, तेथील विकासकामासाठी येणारा खर्च, नकाशे पर्यटन विकास विभागाला सादर करणार आहेत. त्यानंतर शासन प्रस्तावांना मंजुरी देईल. मंजुरी दिल्याबरोबर निधी वर्ग होऊन सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकेल, असेही गुप्ता यांनी सांगितले.

पाहणीनंतर काम
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या जागांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करताना एकत्रित विचार करावा लागणार आहे. कारण बर्‍याचदा सारख्या-सारख्या वस्तू आणि एकसारखेपणा दुसरीकडे असतो. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण कमी होते आणि काही जागांचा विकास होतो तर काहींचा होत नाही. पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सर्वेक्षण, प्लॅन आणि अंतिम मंजुरीनंतर कामाला सुरुवात केली जाईल.

असे करणार सर्वेक्षण
गुप्ता यांनी सांगितले की, आपण आधी शहरातील पांझरा नदीकाठ परिसर, अँम्युझमेंट पार्कसाठीची जागा, आई एकवीरादेवी मंदिर परिसराची जागा, शहराजवळील लळिंग परिसर, हरणमाळ-नकाणे, डेडरगाव तलाव परिसर या सर्व जागांना भेट देणार आहोत. त्या जागांचे नकाशे, त्या ठिकाणी सद्य:स्थितीत असलेली साधनसामग्री, अतिक्रमित, वनजागा आणि राज्य शासनाची जागा याबाबतची माहिती घेतली जाईल. त्यानंतरच जागा विकसित करण्याचा प्लॅन तयार करण्यात येईल.

शहरासह जिल्ह्यातील सर्वच कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहेत. सर्वेक्षण ते प्रत्यक्ष काम सुरू होण्यापर्यंतचा टप्पा लवकर मार्गी लागण्यासाठी प्रसारमाध्यमांसह सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रस्ताव मंजुरीपर्यंत आपण पाठपुरावा केला आहे. काम पूर्ण होण्यासाठीही केला जाईल.
-राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार, धुळे शहर