आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Civil Hospital Patient Harassment To Doctor

धुळे जिल्हा रुग्णालयात नातेवाईकाच आणवा लागतो सुई-दोरा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे: गैरसोई आणि असुविधेमुळे नेहमीच चर्चेत असणार्‍या धुळे जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टरांना सध्या आळसाचा आजार जडला आहे. शस्त्रक्रियेनंतर टाके घालण्यासाठी उपयोगात येणारी सुई-दोरा रुग्णालयात उपलब्ध असताना रुग्णाच्या नातलगांना हे साहित्य बाहेरून आणण्यासाठी पिटाळले जात आहे. डॉक्टरांच्या आळसामुळे रुग्णांना प्रत्येकी 106 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
जिल्हा रुग्णालयातील वादांची मालिका शमलेली नसताना पुन्हा हे रुग्णालय चर्चेत आले आहे. शासनाने नागरिकांच्या आरोग्यास प्राधान्य देत शस्त्रक्रिया व मोठय़ा जखमांवर टाके घालण्यासाठी सुई आणि धागा उपलब्ध करून दिला आहे. असे असताना काही तज्ज्ञ व प्रशिक्षित डॉक्टर रुग्णांना बाहेरून सुई आणि धागा आणावा, अशी सूचना करतात. त्यामुळे काही दिवसांपासून रुग्णाच्या नातलगांना हे साहित्य आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. बर्‍याच वेळा रात्री-अपरात्री हे साहित्य आणण्याची सूचना डॉक्टर करतात. त्यामुळे रुग्णांच्या नातलगांना मेडिकलमधून सुई व धागा आणण्यासाठी 106 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले जात आहेत. रुग्णालयातील काही डॉक्टरांच्या अशा वागण्यामुळे शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुई आणि धाग्याचा उपयोग होत नाही. दरम्यान, शस्त्रक्रियेवेळी सुई आणि धागा बाहेरून मागविल्यास काम लवकर होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
धाग्याची गुणवत्ता
शासनाने उपलब्ध करून दिलेला सुई-धागा हा मेडिकलमध्ये मिळणार्‍या सुई-धाग्याच्याच गुणवत्तेचा असतो. शासकीय धागा पांढर्‍या रंगाचा तर बाजारात मिळणारा धागा काळय़ा रंगाचा असतो. रंगातील या फरकाशिवाय इतर कोणताही फरक या धाग्यात नसतो.
कर्मचार्‍यांवर रोष
डॉक्टरांच्या आळसाची किंमत रुग्णांच्या नातलगांबरोबरच कर्मचार्‍यांनाही भोगावी लागते. सुई-धागा बाहेरून आणण्याची सूचना रुग्णांच्या नातलगांना केल्यावर रुग्णाचे नातलग परिचारिका आणि क र्मचार्‍यांशी वाद घालतात. परिचारिका शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुई-धाग्याने काम करण्यास तयार असतात; परंतु डॉक्टरांच्या हेकेखोरपणामुळे कर्मचार्‍यांची रुग्णांच्या नातेवाइकांसोबत भांडणे होतात.
तोवर मलमपट्टी
डॉक्टरांच्या ह्ट्टापायी नातलगांना सुई व धागा आणण्यासाठी बाहेर जावे लागते. तोपर्यंत रुग्णाच्या जखमांवर ड्रेसिंग, मलमपट्टी करून रक्तस्राव रोखण्यासाठी प्रयत्न होतात.
सुईचे ब्लॅक-मार्केटिंग
आळशी डॉक्टरांच्या सूचनेनंतर रुग्णाचे नातेवाईक सुईच्या शोधात मेडिकलमध्ये जातात. कंपनीने सुई व धाग्याची किंमत 106 रुपये निश्चित केलेली असताना काही वेळा रात्री-अपरात्री काही दुकानदार मुद्दाम अधिक किंमत मागतात. गरज असल्याने संबंधित अधिक पैसे देऊन मोकळे होतात.
धागा ओवण्याचा कंटाळा!
शासनाने टाके घालण्यासाठी उपलब्ध करून दिलेली सुई आणि धागा स्वतंत्र असतो. डॉक्टरांना सुईमध्ये दोरा ओवून नंतर टाके घालावे लागतात. दुसरीकडे मेडिकलमध्ये मिळणार्‍ या ऑन नीडलमध्ये सुईत धागा ओवलेला असतो. त्यामुळे सुईत धागा ओवण्याचे काम टाळण्यासाठी काही आळशी डॉक्टर रुग्णांना मेडिकलमधून सुई-धागा आणण्याची सूचना करतात.