आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरभ्र आकाश.. प्रचंड उकाडा.. ढगाळ वातावरण अन् वार्‍यासंगे पावसाच्या धारा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आला आला वारा संगे पावसाच्या धारा..

मे हीटच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. शनिवारी (दि. 1 जून) सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी 4 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वार्‍यासंगे पावसाच्या धाराही कोसळल्या. या वर्षीचा उन्हाळा अतिशय तप्त होता. एप्रिल, मे महिन्यात तापमानाने चाळिशी ओलांडली होती. मेअखेर तर 45पर्यंत पारा गेला होता. होरपळून टाकणार्‍या या उन्हामुळे जिवाची लाही लाही होत होती. दिवसा तर उन्हाची धग घरात बसल्यावरही सहन होत नाही, अशी परिस्थिती आहे. दिवसा आग ओकणार्‍या सूर्यनारायणाची रात्रीही धग कायम होती. त्यामुळे कधी पावसाला सुरुवात होते, याचीच नागरिकांना प्रतीक्षा होती. तथापि, जूनच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन होईल, याची अपेक्षा नव्हती. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेले नागरिक दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाच्या वातावरणामुळे सुखावले. त्यानंतर वार्‍यासोबत आलेला पाऊस दिलासा देऊन गेला.

धावपळ आणि विजेचा लपंडाव..

सकाळी निरभ्र आकाश. पाऊस येण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यातच प्रचंड उकाडा सुरू झाला. घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले. त्यानंतर अचानक वातावरण बदलले. निरभ्र आकाशात ढगांची गर्दी जमली. ढग काळेभोर झाले आणि वादळी वार्‍यासह पावसाचे जोरदार आगमन झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली. हातगाडी व्यावसायिकांना आडोशाला जावे लागले. रस्त्यावरच्या दुकानदारांनी सामानाची आवरासावर करून घरचा रस्ता धरला. अनेकांचे नुकसानही झाले. वादळी वार्‍यामुळे कुठे वीजतारा तुटल्या तर धोका नको म्हणून वीज कंपनीनेच काही भागात पुरवठा खंडित केला. धुळे शहर परिसरात काही भागात विजा कोसळण्याच्या घटनाही घडल्या. या घटनेत सवाई मुकटी येथे एका वयोवृद्ध व्यक्तीला वीज स्पर्श करून गेल्यामुळे ते भाजले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पेरण्या वेळेवर होतील ...
केरळमध्ये पडत असलेला पाऊस हा मान्सूनचाच आहे. हा पाऊस महाराष्ट्रात सर्वत्र पडत नसून तो काही भागातच पडत आहे. त्यात सातत्य नसल्याने तो मान्सूनपूर्व पाऊस आहे. या पावसामुळे शेतीच्या पूर्वमशागतीच्या कामांना वेग येणार आहे. ज्या शेतकर्‍यांकडे एक-दोन पाणी देता येईल असे संरक्षित पाणीसाठा असेल, अशा शेतकर्‍यांनी कापूस लागवड करून घ्यावी. 7 किंवा 10 जूननंतर राज्यात मान्सून दाखल होईल. या वर्षी पेरण्याही वेळेवर होणार आहेत. रामचंद्र साबळे, हवामान शास्त्रज्ञ