आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Corporation Sealed The Bijale Credit Institute

धुळे महापालिकेने बिजली पतसं‍स्थेला ठोकले सील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेतर्फे थकित मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार शनिवारी बिजली पतसंस्थेच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आले. महापालिकेने प्रथमच थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याचे धाडस दाखविले आहे. त्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरात सत्तर हजारांपेक्षा जास्त मालमत्ताधारक आहेत. सुमारे 35 ते 40 हजार नागरिकांनी महापालिकेचे नळकनेक्शन घेतले आहे. त्यामुळे महापालिकेला मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीतून मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न प्राप्त होते; परंतु महापालिकेच्या वसुली विभागातील कर्मचार्‍यांची जकात वसुलीसाठी नियुक्त असल्याने मालमत्ता कर वसुलीच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. मार्च उजाडला तरी मालमत्ता कर वसुलीचे अपेक्षित काम झालेले नाही. त्यामुळे आयुक्त जीवन सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी वसुली विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. या बैठकीत थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचबरोबर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर एक लाखापेक्षा अधिक कर थकवणार्‍या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यानंतरही थकबाकी न भरणार्‍यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी साडेतीन वाजता वैभवनगरात असलेल्या जिल्हा बिजली कामगार पतसंस्थेच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आले. पतसंस्थेने 1 लाख 43 हजार रुपयांचा कर थकविला आहे. उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या नेतृत्वाखाली वसुली निरीक्षक संजय रनाळकर, निकुभ, कदम, अन्सारी, मस्तान पठाण, लिपिक गढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईपूर्वी पतसंस्थेला नोटीस बजावण्यात आली होती.


वसुलीचा ‘पुणे पॅटर्न’ राबविणार
पुणे शहरातील मोठय़ा थकबाकीदारांविरुद्ध महापालिकेतर्फे त्यांच्या दारासमोर जाऊन बॅँड वाजविण्यात येत आहे. त्याच धर्तीवरच महापालिका प्रशासन आता कारवाईचा विचार करत आहे. थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन थकबाकीदाराच्या नावाचा पुकारा करण्यात येणार आहे. संबंधिताने किती कर थकविला आहे याची माहिती परिसरातील नागरिकांना देण्यात येणार आहे. तसा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

रिक्षाद्वारे आवाहन
शहरातील थकित मालमत्ताधारकांना कर भरण्याचे आवाहन रिक्षाद्वारे करण्यात येत आहे. त्याचाही चांगला परिणाम दिसून येत आहे. अनेक नागरिक महापालिकेत येऊन कराचा भरणा करीत आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे.

21 कोटी वसुलीचे उद्दिष्ट
महापालिकेच्या वसुली विभागातर्फे गेल्या वर्षी मालमत्ता करापोटी 12 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली होती. यंदा वसुली विभागाने 21 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. फेब्रुवारीपर्यंत केवळ 15 टक्के वसुली झाली होती. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे रोज 30 लाखांपेक्षा अधिक वसुली होत आहे. आतापर्यंत सुमारे 12 कोटींची वसुली झाली आहे. यंदा निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यात येईल, असा विश्वास महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.

धास्तावले मालमत्ताधारक
शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर, नागरिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी कर थकविला आहे. त्यांची वृत्तपत्रातून नावे जाहीर झाल्याने जनमानसात त्यांची प्रतिमा खराब झाली आहे. जप्तीमुळे आणखी बदनामी नको यासाठी थकबाकीदारांनी आता कर भरण्यास प्राधान्य दिले आहे. तर काही थकबाकीदारांनी कर भरण्यासाठी मुदत मागून घेतली आहे.