धुळे - महापालिका प्रशासनाने स्थानिक संस्था कर चुकविणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार शुक्रवारी चार व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २५ हजार रुपये वसूल करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी व्यापारी स्थानिक संस्था भरता शहरात माल आणत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. या पथकाच्या माध्यमातून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी करण्यात आलेल्या तपासणीत चार व्यापाऱ्यांनी कर चुकविल्याचे उघडकीस आले.
त्यानुसार वडजाईरोड परिसरातील प्लास्टिक भंगार व्यावसायिक मोहंमद खलिल मोहंमद आसिफ यांच्याकडून सात हजार रुपये, परमार मेटल्सचे मोतीलाल जवेरचंद परमार यांच्याकडून सहा हजार ८३६, बूटविक्रेते सलीम शेख हुसेन, अक्रम शेख सिद्दीकी यांच्याकडून दोन हजार ९०० रुपये तर जवेरचंद सुरतीगंजी (प्रो. जयंतीलाल जवेरचंद परमार, भांडे व्यापारी) यांच्याकडून आठ हजार ७८० रुपये असे एकूण २५ हजार ५१६ रुपये दंडासह वसूल केले. किशोर सुडके, रवींद्र सोनवणे, चंद्रकांत मोरे, बी. एम. कुलकर्णी, एस. टी. भलकार, संजय आगलावे, बी. टी. उशिरे यांनी ही कारवाई केली. व्यावसायिक, उद्योजकांनी आयात केलेल्या मालावर एलबीटी भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
व्यापाऱ्यांची आज होणार बैठक
स्थानिक संस्था कराविषयी चर्चा करण्यासाठी उद्या शनिवारी रात्री नऊ वाजता धुळे व्यापारी महासंघाची नगरपट्टी येथील केमिस्ट भवनात बैठक होईल. त्यात एलबीटीशी संबंधित स्थानिक राज्यस्तरावरील विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहिती व्यापारी महासंघाचे नितीन बंग यांनी दिली.