आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

289 प्रकरणांत आरोपी अज्ञात; वर्षभरात 360 कारवाया

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे: कारवाईबाबत नेहमीच ओरड होत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या नऊ महिन्यांत 360 कारवाया करून लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. कारवाईचा आकडा जरी मोठा असला तरी याप्रकरणी नाममात्र संशयितांनाच अटक झाली असून, 289 प्रकरणांमध्ये आरोपी गवसलेले नाहीत. त्यातून अवैध व्यवसायातील मोठे मासे पथकाच्या गळाला लागलेले नसल्याचे चित्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईचा आलेख पाहिल्यावर समोर आले.
राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बनावट मद्य व त्यांचे मिनी कारखाने सुरू होत आहेत. पिंपळनेर आणि शिरपूर परिसरातील डोंगरदर्‍या आणि दुर्गम भागात असे कारखाने अधिक आहेत. त्यावर लगाम लावण्यासाठी पोलिस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करत आहे. कारवाईत बोटावर मोजण्याइतपत घटनेतच म्होरके हेच पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला गवसले आहेत. एरवी तेथे काम करणारे मजूर आणि त्यांचे साथीदार यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जातो.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर 2011 दरम्यान केलेल्या कारवायांचा गोषवारा बघितला तर एकूण 360 गुन्हे दाखल करण्यात आले व त्यातील 71 आरोपींना अटक करण्यात आली. इतर 289 प्रकरणांमध्ये जप्त मुद्देमाल बेवारस असल्याची नोंद करून प्रकरण बंद करण्यात आले. या कारवायांतून राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 12 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर 71 प्रकरणांपैकी केवळ बोटावर मोजण्याइतपत प्रकरणांमध्ये मुख्य म्होरके हाती लागले आहेत. दरम्यान, डिसेंबर महिन्यासह वर्षभरातील एकूण आकडेवारीचे एकत्रीकरण करण्याचे काम सुरू आहे.