आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्ची संबोधून मुलांनी काढली छेड; पालकाचा मुख्याध्यापकावर संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - गेल्या अनेक दिवसांपासून इयत्ता चौथीमधील बालिकेला आर्ची म्हणून चिडविण्यात येत होते. छेडखानीचा हा प्रकार पालकाने मुख्याध्यापक अनारसिंग पावरा यांना सांगितला; परंतु संंबंधित नववीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली नाही, असा ठपका ठेवत पालकाने चक्क मुख्याध्यापक पावरा यांच्यावर चप्पल उगारली. देवपुरातील रा.के. चितळे विद्यालयात शुक्रवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी मुख्याध्यापक पावरा यांच्या तक्रारीवरून पालकाविरुद्ध देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाल अाहे. घटनेच्या वेळी पालक मद्यधुंद असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. दुसऱ्या गटानेही मुख्याध्यापक पावरा यांनी दमदाटी केल्याची तक्रार दाखल केली.

देवपुरातील भाजीपाला बाजारापासून काही अंतरावर रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेपासून काही अंतरावर असलेल्या वसाहतीमधील एक बालिका इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आहे. गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सत्रातील इयत्ता नववीमधील काही विद्यार्थी या बालिकेला आर्ची असे संबोधून तिची छेड काढत होते. हा प्रकार संबंधित मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापक अनारसिंग पावरा यांना सांगितला होता. शिवाय संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून मुलांना समज द्या, अशी मागणी त्यांनी केली होती. शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामे सुरू होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन पुरुष या ठिकाणी आले. यापैकी एक बालिकेचा पालक होता. छेड काढणाऱ्या मुलांना काय समज दिली? त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असे बोलून त्यांनी संपूर्ण शाळा डोक्यावर घेतली. तसेच मुुख्याध्यापकांवर आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यानंतर संंबंधित पालकाने उजव्या पायातील चप्पल काढून मुख्याध्यापक पावरा यांच्या डोक्यावर मारली. आवाज एेकून किरण साळुंके, मनोजकुमार सूर्यवंशी, सुरेश कोकणी, मगन भामरे, राजेश सूर्यवंशी, मुग्धा रेंभोटकर, चैताली देसले, रतिलाल पावरा हे शिक्षक मदतीला धावून आलेत. यादरम्यान देवपूर पोलिसांनाही घटनेबद्दल कळविण्यात आले. तोपर्यंत या संतप्त पालकाने मुख्याध्यापक पावरा यांच्या टेबलावरील कागदपत्रे इतस्तत: फेकली होती, तर त्यासाेबत आलेला अन्य एक जण या पालकाला मारहाणीपासून परावृत्त करून वाद सोडविण्याचा प्रयत्न करत होता.

घटनेनंतर मुख्याध्यापक पावरा, शिक्षक तसेच पालक हे देवपूर पोलिस ठाण्यात आले. माहिती मिळताच काही शिक्षक संघटनांचे प्रतिनिधीदेखील पोलिस ठाण्यात आलेत. घटनेचा निषेध नोंदविल्यानंतर सायंकाळी जिल्हा प्रशासनालादेखील याबाबत निवेदन देण्यात आले. यासंदर्भात मुख्याध्यापक पावरा यांच्या तक्रारीवरून पालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा, तर मुख्याध्यापकांनी दमदाटी केली म्हणून पालकाच्या विराेधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून गुन्हाही दाखल झाला आहे. पुढील तपास देवपूर पोलिस करीत आहेत.

गुन्हा अाराेपीला अटक...
या प्रकरणी मुख्याध्यापक अनारसिंग पावरा यांनी देवपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून उदय शिरसाठ यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक वाडिले करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दरम्यान, संबंधितांकडून पाेलिस स्टेशनसमाेर गर्दी करण्यात अाली हाेती.

चौघांकडून छेड
आठदिवसांपूर्वी चार विद्यार्थ्यांनी छेड काढल्याची तक्रार पालकांनी दिली होती. शाळेच्या प्रशासनाने या चौघा मुलांना समज दिली; परंतु यानंतर संबंधित पालक शुक्रवारी शाळेत आले. शाळेने कोणतीही कारवाई केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच दरम्यानच्या काळात बालिकेच्या आईनेदेखील या मुलांना मुख्याध्यापकांकडे नेण्याचा प्रयत्न केला असता, या मुलांनी उर्मटपणे वागणूक दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

मुलांना दिली होती समज
मुलांना योग्य ती समज दिली होती. शिवाय त्यांच्याकडून माफीनामादेखील लिहून घेत मुलांच्या पालकांना त्यांचा प्रताप कळविला होता. शुक्रवारी दुपारी कामात व्यस्त असताना मुलीचे पालक आले. गोंधळ घालून त्यांनी शांतता भंग केली. घटनेच्या वेळी ते मद्यधुंद होते. त्यांनी गैरवर्तणूक केल्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. -अनारसिंगपावरा, मुख्याध्यापक

पेपर केला रद्द
सध्या सहामाही परीक्षा सुरू आहे. शुक्रवारी इयत्ता पाचवी ते दहावी वर्गांचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. शाळेत गोंधळ निर्माण झाल्यामुळे शिक्षकांना परीक्षाही रद्द करावी लागली. तथापि, उद्या, शनिवारी मात्र नियमित वेळेत परीक्षेची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या घटनेबद्दल ‘दिव्य मराठी’ने शाळेशी संपर्क साधला असता, त्यांनीही याला दुजाेरा दिला आहे. शिवाय हा पेपर नव्याने घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. यामुळे शाळेच्या आवारात गर्दी झाली असल्याचे दिसून आले.
बातम्या आणखी आहेत...