आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओल्या पाटर्य़ा आणि सर्रास अनैतिक प्रकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील गोंदूर रोडवर सुमारे आठ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या जिल्हा क्रीडासंकुलाचा उपयोग खेळाडूंना कमी आणि रात्री रंगणार्‍या ओल्या पाटर्य़ा, अनैतिक प्रकार करणार्‍यांसाठी अधिक होत आहे. रात्री आठ वाजेनंतर परिसरातील कोणताही सभ्य नागरिक या भागातून जाण्याचे टाळतो. विशेषत: महिला या प्रकाराला पुरत्या कंटाळल्या आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिला तर शहराच्या वैभवात भर घालणार्‍या या संकुलामुळे बदनामीच अधिक वाट्याला येईल.
कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने धुळ्यात जिल्हा क्रीडासंकुलाची निर्मिती केली आहे. मोठय़ा दिमाखात त्याचा लोकार्पण सोहळाही पार पडला. शहराच्या सुंदरतेत भर घालणार्‍या या वास्तूमुळे क्रीडापटूंचीदेखील सोय झाली आहे. वाडीभोकर रोड आणि गोंदूर रोडलगत असलेल्या या क्रीडासंकुलाच्या बाहेरील बाजूस व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. यापैकी बहुतांशी आजदेखील बंद अवस्थेत आहे. क्रीडासंकुलाच्या भोवती डांबरीकरण तसेच प्रकाशझोतासाठी उत्तम व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. असे असताना गेल्या काही काळापासून क्रीडासंकुलाच्या सुंदरतेला समाजकंटकांचे ग्रहण लागले आहे. दररोज रात्री नऊनंतर या भागात मद्यपी आणि गुंड तरुणांचे टोळके वावरताना दिसते. जवळच असलेल्या बिअरबार अथवा वाइन शॉपमधून मद्य आणून रस्त्यानजीक तळीरामांची पार्टी रंगते. सिगारेटचा धूर, शिवराळ भाषेतील संवाद आणि अश्लील हावभाव करीत गावगुंडांचा सार्वजनिक ठिकाणी उच्छाद सुरू असतो.
रस्त्यावरून जाणार्‍या सभ्य नागरिकांदेखत हा प्रकार सुरू असतो. तथापि, वाद नको म्हणून नागरिक निमूटपणे पाहून पुढे चालते होतात. क्रीडासंकुल परिसरातील झाडी, गटारी, पायर्‍या, आडोशाच्या जागा, बंद दुकानाजवळील कोपरा आणि पथदिव्यांचा प्रकाश न पोहोचणार्‍या भागात हे तरुण बसलेले असतात. या ठिकाणी मद्य, पाणी आणि सोडाच्या बाटल्या, सिगारेटची थोटके, रिकामे पाकीट, गुटख्याच्या पुड्या, पानमसाला खाल्ल्यानंतर उडवलेल्या पिचकार्‍या आदी सर्रासपणे दिसून येते. क्रीडासंकुलाजवळ ठिकठिकाणी टारगट तरुणांचे टोळके बसलेले असते. काही तरुण, तरुणी कानाकोपर्‍यात अश्लील चाळे करीत असतात. यामुळे रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडणार्‍या महिला या भागातून जाण्याचे टाळतात. तर इच्छा नसूनही या मद्यपींची शिवराळ भाषा ऐकावी लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
वाडीभोकर रोडच्या तुलनेत गोंदूर रोडवरून उघड्यावर रंगणार्‍या ओल्या पाटर्य़ा नेहमीच पाहावयास मिळतात. काही माथेफिरू तर मद्यपानानंतर रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फोडून गोंधळ घालतात. मद्यपींचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे परिसरातील वसाहतींमधील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागत आहे. याबाबत पोलिस प्रशासन तसेच क्रीडासंकुलाची देखभाल करणार्‍यांकडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे. गावगुंडांचा वेळीच बंदोबस्त करून उघड्यावरील ओल्या पाटर्य़ा बंद कराव्यात, अशी रास्त अपेक्षा या भागातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
‘दिव्य मराठी’ कडे तक्रार - या गंभीर प्रकाराने वैतागलेल्या नागरिकांनी ‘दिव्य मराठी’कडे पोस्ट कार्डमार्फत तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, मी दिव्य मराठीचा नियमित वाचक आहे. गोंदूर रोडस्थित इंद्रप्रस्थ कॉलनीत राहायला आहे. दररोज कॉलनी परिसरातील महिला सकाळी, रात्री क्रीडासंकुलात फिरण्यासाठी जातात. पण हे संकुल अवैध धंद्यांचे केंद्र बनले आहे. रात्री नऊ वाजेनंतर तरुणवर्ग जवळच असलेल्या बिअरबारमधून मद्य आणून ते कानाकोपर्‍यात पितात. बर्‍याच वेळेस धिंगाणाही घालतात. सकाळी रिकाम्या बाटल्या पडलेल्या असतात. बर्‍याचवेळेस पांढर्‍या कारमधून तरुणीला आणून ती कार आडोशाला लावून अनैतिक प्रकार चालतात. दिव्य मराठी नेहमीच प्रश्नांना वाचा फोडते. त्यामुळेच ही तक्रार पाठविली आहे. चांगल्या संकुलाला कलंक लागू नये हाच उद्देश आहे.
तसे आढळल्यास तक्रार देऊ - जिल्हा क्रीडासंकुल आणि परिसरात रात्री अपरात्री जर काही असा प्रकार सुरू असेल आणि ते आढळून आल्यास पोलिसात तक्रार दिले जाईल. पोलिसांचे गस्ती पथक तसेच क्रीडासंकुलाचा पहारेकरी या ठिकाणी बंदोबस्तावर असतो. शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, धुळे