आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे : प्रभागरचनेबाबत दोन हरकती; 7 सप्टेंबरपर्यंत मुदत, अजून हरकती येण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. त्यावर महापालिका प्रशासनाकडे दोन हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत शनिवार (दि.7) पर्यंत असल्याने अजून काही प्रमाणात इच्छुकांसह नागरिकांच्या हरकती महापालिकेत दाखल होण्याची शक्यता आहे.

महापालिकेची निवडणूक नव्या नियमानुसार यंदा वॉर्डाऐवजी प्रभागानुसार होणार आहे. त्यात 50 टक्के जागा या महिलांसाठी राखीव आहेत. त्यासाठी गत आठवड्यात आरक्षण काढून प्रारूप रचना जाहीर करण्यात आली. त्यावर राजकीय पक्षांसह नागरिकांना 29 ऑगस्टपासून हरकती दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला. पहिल्या चार दिवसांत एकही हरकत प्राप्त झाली नव्हती. बुधवारी दोन हरकती दाखल करण्यात आल्या. त्यात भगवान बळीराम वाघ यांनी प्रभाग क्रमांक 32मध्ये लोकसंख्या जास्त असल्याची हरकत नोंदविली आहे. या प्रभागाची लोकसंख्या 10 हजार 656 आहे. त्यामुळे निवडून येणार्‍या नगरसेवकाला कामकाज करताना अडचणी निर्माण होतील. त्यातुलनेत प्रभाग क्र. 17 ची लोकसंख्या 9 हजार 307 आणि प्रभाग क्र. 18 ची लोकसंख्या 8 हजार 827 इतकी आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 32 ची लोकसंख्या कमी करून ती या दोन प्रभागात टाकण्यात यावी, अशी मागणी हरकतीत करण्यात आली आहे. तर दुसरी हरकत आरिफ शेख मुसा यांनी प्रभाग क्रमांक सातबाबत दाखल केली आहे. सातमध्ये समावेश असलेला काही भाग हा पूर्वीप्रमाणे प्रभाग नऊमध्येच जोडण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हरकतींसाठी अद्याप 3 दिवस आहेत.

रचनेबाबत अनेकांचा गोंधळ

प्रभागरचनेमध्ये अ आणि ब असे दोन भाग असणार आहेत. त्यात यंदा प्रभागरचनेत मोठे फेरफार झाले आहेत. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे नेमकी हरकत कशाबद्दल घ्यावी, अशी स्थिती काहींची झाली आहे. त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन शेवटच्या दोन दिवसांत त्यासंदर्भात हरकती दाखल केल्या जातील, अशी शक्यता आहे.

पक्ष पदाधिकार्‍यांची उद्या शहरात बैठक
महापालिका निवडणुकीबाबत मतदार यादी आणि जातीचा दावा तपासण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आणि त्याबाबत असलेला संभ्रम दूर व्हावा यासाठी शुक्रवारी (दि. 6) दुपारी 4 वाजता महापालिकेच्या सभागृहात राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त दौलतखान पठाण असणार आहेत. या बैठकीत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या उमेदवारांचा जातीचा दावा तपासणीबाबत आलेले पत्र, मतदारांचे नाव समाविष्ट, दुरुस्ती करणे आदींबाबत चर्चा होणार आहे.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी तत्काळ प्रस्तावाचे आवाहन
महापालिकेची निवडणूक लढवू इच्छुक मागासवर्गीय उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करावेत, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये केले आहे. धुळे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर- डिसेंबर 2013 दरम्यान होणार आहे. ही निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी इच्छुक मागासवर्गीय उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी योग्य त्या कागदपत्रांसह जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक लढवू इच्छुकांना आता आवश्यक कागदपत्रांसाठी धावपळ करावी लागणार आहे. कारण ते वेळेच्या आत प्राप्त करून घेण्याची जबाबदारी त्यांची राहाणार आहे. या प्रमाणपत्राशिवाय निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही. त्यासाठी उमेदवारांची आता हे प्रस्ताव सादर करण्यासाठी होणारी धावपळ वाढणार आहे.