आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल न झाल्यास फटके आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - बनावट पावत्यांद्वारे पारगमनशुल्क वसुलीप्रकरणी उपायुक्त प्रदीप पठारे, सहायक आयुक्त पल्लवी शिरसाठ यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी महापालिकेत आंदोलन केले. आयुक्त जीवन सोनवणे यांनी सायंकाळपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा दोन दिवसानंतर फटके आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

गेल्या एक ते दीड वर्षापासून महापालिका प्रशासनातर्फे जकात वसुली करण्यात येत आहे. त्यासाठी विविध नाक्यांवर तीन शिफ्टमध्ये कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी चितोड जकात नाक्यावर बनावट पावत्यांद्वारे पारगमनशुल्क वसुली होत असल्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी काही कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हा विषय चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे सोमवारी महापालिकेत आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी, विरोधी पक्षनेते संजय गुजराथी, नगरसेवक महेश मिस्तरी, संजय जाधव, नरेंद्र परदेशी, राजेंद्र पाटील, रवींद्र काकड, भगवान गवळी, प्रशांत र्शीखंडे, देवीदास लोणारी, जितेंद्र जगताप आदी उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने ज्या दिवसापासून जकात वसुलीस प्रारंभ केला आहे. त्या दिवसापासून जकातचोरीच्या घटना वाढल्या आहेत. जकात विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. शिवसेनेने यापूर्वीही अनेकवेळा जकात वसुलीत गोंधळ होत असल्याचा आरोप केला होता. त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही. जकात विभागातील गैरव्यवहारप्रकरणी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, सहायक आयुक्त पल्लवी शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि.7) निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे सोमवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत आयुक्त जीवन सोनवणे यांनी सायंकाळपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा दोन दिवसांनी फटके आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला.

शहरातील अलंकार सोसायटी, नवनाथ सोसायटीत गटारींचे काम निकृष्ट
शहरातील नवनाथनगर, अलंकार सोसायटीत महापालिकेतर्फे गटारींचे काम करण्यात आले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.
या प्रश्नासाठी सोमवारी परिसरातील नागरिकांनी उपायुक्त हनुमंत कौठळकर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. नवनाथनगर, अलंकार सोसायटीत तीन महिन्यांपूर्वी गटारीचे काम झाले होते. या गटारीचे कॉँक्रीट ढासळत आहे. गटारीचा उतार योग्य प्रकारे न काढल्याने गटारीत पाणी तुंबते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारावर महानगरपालिकेने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. गटारीच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या वेळी उपायुक्त हनुमंत कौठळकर यांच्याकडे करण्यात आली. हा प्रश्न न सोडविल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. निवेदनावर प्रदीप जाधव, मोतीराम मिस्तरी, गोपाल पाटील, के. टी. चव्हाण, यमुनाबाई चौधरी, संजय खैरनार, शांताराम चौधरी, कैलास वाडेकर यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.