आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोकाट गुरेमालकांना नोटीस; वाहतुकीला अडथळा, नागरिकांची कायमच होती ओरड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरात मोकाट गुरांची समस्या मोठी आहे. अगोदरच रहदारीसाठी डोकेदुखी ठरत असताना त्यात मोकाट गुरांचा त्रास वाढल्याचे दिसत आहे. त्यांचा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ते प्रय} केले जात आहेत. आता शहरात फिरते चारा व्यावसायिक आणि मोकाट गुरांच्या मालकांना महापालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत.

शहरात मोठय़ा प्रमाणात मोकाट जनावरे फिरताना दिसतात. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुख्य मार्ग आणि शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर तसेच चौकात गुरे बिनदिक्कतपणे फिरतानाचे दृश्य कुठेही दृष्टीस पडते. त्यात गायींचे प्रमाण जास्त आहे. शहरात रस्त्यावर कळपाने फिरतात. चौकात भाजीपाला विक्रेते असल्याने भाजी विक्रेते उरलेला भाजीपाला तेथे फेकत असल्याने येथे जनावरांची गर्दी होते. दत्तमंदिर चौक ते थेट बारापत्थर, शिवाजी महाराज चौकापर्यंत या मोकाट गुरांचा मुक्त संचार आढळून येतो. रस्त्यावर अगोदरच वर्दळीचे प्रमाण मोठे असल्याने मुख्य चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार होतात. त्यातच ही जनावरे रस्त्यावर चालतात बर्‍याचदा रस्त्याच्या कडेला, चौकात बसून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यांना टाळून जावे लागत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. त्यांना हटविणेही या वेळी मुश्कील होते. त्यामुळे शहरात कोणत्याही ठिकाणी गेल्यास हे गुरे दिसून येतात. पाचकंदील चौक, पाटबाजार, दत्तमंदिर, पारोळा रोड, साक्री रोड भागात आणि इतरही भागात जनावरे फिरताना दिसणे नित्याची बाब आहे. या मोकाट गुरांवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई करण्यात येऊन गुरांना कोंडवाड्यात कोंडून गुरांच्या मालकांना दंडही ठोठावण्यात आला होता. मात्र ही कारवाई मध्यंतरी थंडावली होती. पुन्हा ही जनावरे फिरत आहे. तसेच शहरात काही चारा विक्रेते असल्याने त्यांच्या मागे तर हा जनावरांचा कळप फिरत असल्याने रहदारीला त्रास होत आहे. त्यामुळे या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य विभाग एक पथक स्थापन करणार आहे. त्यानुसार या नोटिसा देण्यात येत आहे.

यापूर्वीही मनपाने केली होती कारवाई
शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांची समस्या होती. यावर मध्यंतरी कारवाईदेखील केली होती. तसेच जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यातही ठेवून गुरेमालकांकडून आर्थिक दंड वसूल करण्यात आला होता. या ठिकाणाहून काही जनावरांना त्यांच्या मालकांनी विना दंड येथून नेले होते. त्यामुळे आता अगोदरच त्या मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे आता लवकरच शहर मोकाट जनावरमुक्त होण्यास मदत होणार आहे.

वाहन तयार करणार
शहरातील मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात येणार आहे. याकरिता शहरात फिरून ही जनावरे वाहनातून घेऊन जाणार आहेत. त्याकरिता आरोग्य विभाग त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वाहनाचा उपयोग करण्यात येणार आहे. त्या वाहनाला रॅम्पही राहणार आहे. चारही बाजूने ते बंदिस्त असेल.

मोकाट गुरांसाठी पथक
शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम उघडण्यात येत असून त्यांना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकात तीन मुकादम, तीन स्वच्छता निरीक्षक आणि दहा कर्मचार्‍यांचा समावेश राहणार आहे. काही दिवसात पथक तयार करण्यात येईल. डॉ. रत्नाकर माळी, स्वच्छता निरीक्षक