आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - सरकारी नोकरांच्या बॅंकेच्या निवडणुकीपूर्वीच वातावरण तापायला लागले आहे. त्याचा पहिला झटका म्हणून न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक निर्णय अधिकारी बदलवण्यात आले आहेत.
उपनिबंधक रामेंद्रकुमार जोशी यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागेवर उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी रवींद्र भारदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धुळे नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांच्या बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी उपनिबंधक रामेंद्रकुमार जोशी यांनी पुणे येथील निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनांचे उल्लंघन करून प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम घाईत जाहीर केला. त्यामुळे बॅंकेचे माजी चेअरमन रवींद्र खैरनार, राजेंद्र शिंत्रे, चंद्रशेखर पाटील, प्रवीण भदाणे, वसंत चव्हाण, संगीता आव्हाड यांच्यासह सभासदांनी हरकत घेऊन जोशी यांच्या कार्यपद्धतीविषयी पुराव्यांसह आक्षेप नोंदवत तक्रार केली.
मात्र, पुणे येथील सहकार आयुक्तांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे अॅड. विजय चौधरी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने दि.५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेत उपनिबंधकांना बदलवता येईल किंवा दूर ठेवता येईल काय? याची विचारणा सरकारी वकील एस.एस.टोबे यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी नोटीस बजावून प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली.
उपनिबंधकांनी शिरपूर येथील सहायक निबंधक मनोज चौधरी यांचे नाव सहकार विभागाकडे पाठवले होते. मात्र, त्यांच्या नावाचा प्रस्ताव फेटाळत भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्या नियुक्तीचे आदेश सहायक सहकार निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिले. तसे प्रतिज्ञापत्रही सहकार विभागाने दाखल केले, अशी माहिती याचिकाकर्ते राजेंद्र शिंत्रे यांनी दिली.
दरम्यान, निवडणुकीपूर्वीच दोन याचिका न्यायालयात दाखल झाल्या. त्यावर निकालही दिले. त्यामुळे ग.स.बँकेची निवडणूक तापणार असल्याचे दिसते. दोन गटांमध्ये ही निवडणूक चुरशीची होणार आहे.