आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका करणार अतिक्रमणे जमीनदोस्त; प्रभाग प्रमुखांना मोहिमेच्या सूचना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरात काही वर्षांपूर्वी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर ही मोहीम ठप्प झाली आहे. त्यामुळेच वाहतुकीचा प्रश्न जटिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील संवेदनशील भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस आणि महापालिका प्रशासन संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहे.

शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. देवपूर, साक्री रोड, वाडीभोकर, नकाणे रोड आदी भागात अनेक नवीन वसाहतींची निर्मिती होत असली तरी दुसरीकडे शहरातील अनेक भागात झपाट्याने अतिक्रमण होत आहे. त्यातून मुख्य रस्तेदेखील सुटलेले नाहीत. काही भागात पक्क्या स्वरूपातील अतिक्रमण झाले असून, काही भागात नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे विविध भागात वाहतुकीची कोंडी नित्याची बाब झाली आहे. अनेक भागात गटारींवर अतिक्रमण झाल्याने त्यांची स्वच्छता करणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे आता महापालिकेने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण काढण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. बैठकीत शहरातील संवेदनशील भाग कोणते, कोणत्या भागातील अतिक्रमण काढणे आवश्यक आहे, अतिक्रमण काढण्यासाठी किती पोलिसांची गरज भासेल यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. चारही प्रभागातील प्रमुखांना अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची सूचना देण्यात आली आहे. आग्रा रोड, चाळीसगाव रोड आणि बारपत्थर भागातील दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे का हे तपासण्यात येईल. ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल. महापालिकेने मोहीम सुरू केल्यानंतर ती आता थांबवू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चित्तरंजन सोसायटीत मोहीम

शहरातील गजानन कॉलनी परिसरातील चित्तरंजन सोसायटीतील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर 27 जणांनी अतिक्रमण केले होते. ही अतिक्रमणे महापालिकेतर्फे काढण्यात आली आहेत. शहरातील विविध भागातील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर आहे. अनेक भागात नागरिकांनी बिनधास्त अतिक्रमण केले आहे. गजानन कॉलनी परिसरातील चित्तरंजन सोसायटीतील सव्र्हे नं 394, 2 अ मधील 11 हजार चौरसफूट मोकळ्या जागेवर 27 कुटुंबांनी येथे अतिक्रमण करीत तात्पुरत्या स्वरूपाच्या झोपड्या उभारल्या होत्या. त्याची माहिती महापालिके ला मिळाली. त्यानंतर शाळा क्र मांक 4 प्रभाग कार्यालयाचे प्रमुख नंदू बैसाणे, अभियंता हेमंत पावटे आणि सहकार्‍यांनी कारवाई करत हे अतिक्रमण हटविले. त्याचबरोबर बारापत्थर रस्त्यावरील 75 दुकानदारांसह भंगार बाजारातील अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्यामुळे हे दोन्ही भाग मोकळे झाले आहे. प्रशासनातर्फे चाळीसगाव आणि मालेगाव रोडवरील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

अतिक्रमण काढणार
शहरातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे सर्वप्रथम संवेदनशील भागातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. शहरातील कोणत्या भागात अतिक्रमण आहे, याची माहिती घेण्यात येऊन पोलिस संरक्षणात अतिक्रमण काढण्यात येईल. पोलिस प्रशासनाशी चर्चा केली जाईल. जीवन सोनवणे, आयुक्त, महापालिका

वडजाई रस्त्यावर कारवाई
सूर्यमंदिर ते वडजाई रस्त्यादरम्यान पन्नास फुटांचा रस्ता असल्याचे मूळ ले-आऊटमध्ये दिसते. मात्र सद्य:स्थितीत रस्त्यावर परिसरातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. नंदू बैसाणे, प्रभाग कार्यालय प्रमुख