आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule : Illegal Construction Information Present Within The Tenth Days

धुळे : नियमबाह्य बांधकामांची माहिती दहा दिवसांत सादर करा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरात विनापरवानगी, नियमबाह्य करण्यात आलेल्या बांधकामांसह धोकादायक इमारतींची माहिती 10 दिवसांत सादर करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. ही माहिती संकलित झाल्यावर नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ठाण्यातील मुंब्रा भागात काही दिवसांपूर्वी एक इमारत कोसळली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी सर्व महापालिकांना नियमबाह्य इमारतींची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आयुक्त जीवन सोनवणे यांनी नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियमबाह्य, विनापरवानगी केलेल्या बांधकामांची माहिती 10 दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या हद्दीत बांधकाम करण्यापूर्वी नगररचना विभागाची मंजुरी घेणे आवश्यक असते. त्यानुसार शहरातील किती मालमत्ताधारकांनी परवानगी घेऊन मंजूर आराखड्यानुसार बांधकाम केले आहे याची माहिती नगररचना विभागातर्फे घेण्यात येणार आहे. हे काम करताना शहरातील पडक्या इमारतींची माहितीही संकलित केली जाणार आहे. त्यासाठी शहराचे चार विभाग करून अभियंत्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागात मोठय़ा प्रमाणावर दाट वसाहती आहेत. शहरापासून साधारणपणे तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या देवपूर, वाडीभोकर रोड, साक्री रोड, गोंदूर रोड, चक्करबर्डी परिसरात अनेक नवीन बांधकामे होत आहेत. त्यामुळे या भागांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.


इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट
महापालिकेच्या हद्दीतील ज्या इमारतींचे बांधकाम सुमारे तीस वर्षांपूर्वी झाले आहे, अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. या ऑडिटमुळे संबंधित इमारती राहण्यायोग्य आहेत किंवा नाही हे कळणार आहे. त्यामुळे संभाव्य धोका टळण्यास मदत होणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी प्रशासनातर्फे स्ट्रक्चरल ऑडिटर नियुक्त करण्यात येणार आहे.