आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे जिल्हा परिषदेने केली 42 शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्हा परिषदेचे 42 शिक्षक आणि दोन विस्तार अधिकार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या मंगळवारी करण्यात आल्या. तर उद्या बुधवारी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या विनंती बदल्या करण्यात येणार आहेत. जिल्हा पातळीवरील प्रशासकीय बदल्यांसाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी उसळली होती. त्यात आदिवासी भागात पाच वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचार्‍यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाणे, शिक्षणाधिकारी प्रकाश आंधळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, सर्वशिक्षा अभियानाचे प्रकाश रणदिवे, कक्ष अधिकारी शा. ना. जगताप यांच्यासह आयुक्त कार्यालयातून निरीक्षक प्रतिभा संगमे उपस्थित होत्या. प्रशासकीय बदल्यांसाठी जिल्ह्यातील 198 पात्र शिक्षकांची यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्याचबरोबर आदिवासी भागातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी पेसा कायद्यानुसार 55 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर विनंती बदलीसाठी 294 आणि आपसी बदलीसाठी 13 प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

अशी झाली प्रक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदिवासी भागात पाच वष्रे सेवा बजावणार्‍या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांचे नियोजन करण्यात आले. त्यात 670 शिक्षक पात्र ठरले. या शिक्षकांना तालुकास्तरावर बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी फक्त 36 शिक्षक आदिवासी भागातून बाहेर जाण्यास इच्छुक होते. त्या शिक्षकांच्या मंगळवारी मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी फक्त 18 शिक्षकांनीच बदलीच्या ठिकाणी जाण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे फक्त आदिवासी भागातील 18 शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या. तर आदिवासी भागाव्यतिरिक्त अन्य भागातून 24 शिक्षकांच्या आदिवासी भागात अशा 42 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. दोन विस्तार अधिकार्‍यांच्याही बदल्या झाल्या. बदलीचे आदेश झालेल्या शिक्षकांना सात दिवसांच्या आत मुख्यालयी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.


आयुक्त कार्यालयाचे लक्ष
शिक्षण विभागाच्या बदल्यांवर आयुक्त कार्यालय लक्ष ठेवून आहे. त्यासाठी मंगळवारी आयुक्त कार्यालयातून प्रतिभा संगमे या निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. या बदल्यानंतर अनेक शिक्षक अपिलात जाण्याची शक्यता आहे.

आज विनंती बदल्या
विनंती बदल्यांतर्गत सोयीचे ठिकाण मिळावे यासाठी 294 शिक्षकांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत. तर 13 शिक्षकांनी आपसी बदलीसाठी अर्ज केले आहेत. त्यांचे उद्या बुधवारी समुपदेशन होईल. तर 10 मुख्याध्यापक आणि 17 केंद्रप्रमुखांच्या देखील बदलीसाठी मुलाखती होणार आहेत. विनंती बदली करताना रिक्त जागांचा विचार केला जाणार आहे.