आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Municipal Corporation Disaster Manegmenet Squad Strong On Paper

धुळे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक कागदावर मजबूत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरात आपत्कालीन प्रसंग निर्माण झाल्यास नागरिकांना वेळेवर योग्य ती मदत उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकाची स्थापना केली आहे. या पथकातर्फे पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर बैठकीव्यतिरिक्त इतर कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे हे पथक कागदावरच मजबूत आहे.


पावसाळयाच्या दिवसात नैसर्गिक संकट निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत मिळावी यासाठी राज्य शासनातर्फे पावसाळयापूर्वीच महापालिकेला आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने या पथकाची स्थापना केली आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांची तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे यांच्या उपस्थितीत जून महिन्यात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पथकाला विविध सूचना करण्यात आल्या होत्या. त्यात महापालिकेत चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासह या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्याची सूचना करण्यात आली होती. महापालिकेत नियंत्रण कक्ष स्थापन झाला असला तरी हा कक्ष कागदावरच असल्याची स्थिती आहे. कारण या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक महापालिका प्रशासनाने जाहीर केला असला तरी त्याची अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे जर शहरात एखादे नैसर्गिक संकट निर्माण झाले तर नागरिक संपर्क साधणार कोठे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्याची गरज आहे. त्याचबरोबर या पथकातील अधिकार्‍यांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्याची गरज आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे दोन वर्षांपूर्वी येथील नकाणे तलाव परिसरात सराव शिबिर घेण्यात आले होते. यावर्षी अशा प्रकारचे सराव शिबिरही घेण्यात आलेले नाही. एकंदरीतच हे पथक कागदावर कार्यरत असल्याचे चित्र आहे. त्याकडे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष दिले पाहिजे.


अकरा जणांचे पथक
महापालिकेने मे महिन्यातच आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन केले आहे. या पथकामध्ये अकरा जणांचा समावेश आहे. त्यात काही पट्टीचे पोहणारे आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकाची जून महिन्यात बैठक घेण्यात आली असून, त्यांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत.