आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छुक उमेदवार पडले काळजीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिका निवडणुकीला कमी कालावधी उरला असल्याने उमेदवारांची काळजी वाढू लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील प्रत्येक घटना-घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे इच्छुकांनी आपला गड शाबूत राखण्यासाठी प्रभागातील नागरिकांशी संपर्क वाढवला आहे.

महापालिका निवडणुकीत या वेळी वेगवेगळे रंग पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रभागरचना राहणार असून, 35 प्रभागांची रचना जाहीर झाली आहे. प्रभागरचनेनंतर इच्छुकांनी आपल्या उमेदवारीची स्वयंघोषणा केली आहे, तर राजकीय पक्ष कोणाचे कोणत्या प्रभागात वर्चस्व आहे व कोणता उमेदवार प्रभावी ठरू शकतो याचा अभ्यास करत आहेत. तसेच त्यासाठी राजकीय पक्षांकडून बैठका घेतल्या जात आहेत. या वेळी प्रभागात विरोधी पक्षाची काय स्थिती आहे, याची माहिती घेण्यासह कोणता उमेदवार निवडणूक लढवणार व कोण जिंकून येणार याचाही अंदाज घेतला जात आहे. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांची घोषणा केलेली नसली तरी, उमेदवारांची चाचपणी पक्षांतर्गत बैठकीतून घेण्यात येत आहे. त्यात विशेषत: महिला उमेदवारांचा शोध घेणे राजकीय पक्षांसाठी आव्हानात्मक आणि निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीत 35 महिलांना उमेदवारी द्यावयाची आहे. त्याकरिता योग्य महिला उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. त्याचप्रमाणे 70 प्रभागांतील उमेदवारांची निवड विविध राजकीय पक्षांना करावयाची आहे. यंदाची निवडणूक शिवसेना आणि भाजप युती करून लढणार आहे. त्याबाबत अजून बोलणी सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसचीही तयारी जोरात सुरू आहे.

विद्यमान स्थितीत महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांनी अजून ताकद वाढवण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच लोकसंग्राम पक्षाने सर्व जागांवर महिलांनाच उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारे निवडणुकीचे वातावरण तयार होत असून, प्रभागांमध्ये इच्छुकांचा ठिय्या वाढला आहे. महापालिकेत कमी आणि प्रभागात जास्त फिरताना व चौकाचौकात थांबून नागरिकांसह युवकांशी चर्चा करताना दिसत आहेत. मतदारांची यादी अद्याप जाहीर झाली नसली तरी, प्रभाग निश्चित झाल्याने त्यानुसार त्यांचा संपर्क सुरू आहे.