आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार अनिल गोटेंविरोधात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना एका व्यासपीठावर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहराच्या विकासकामांसाठी पक्षविरहित राजकारण केले. सर्वांच्या प्रयत्नांमुळेच महापालिकेला 15 कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीतून विकासकामे करण्यात अडथळा निर्माण करू पाहणार्‍या शुक्राचार्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, अशी टीका माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी आमदार अनिल गोटे यांच्यावर नाव न घेता केली. लेनिन चौकात उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलाच्या उद्घाटनप्रंसगी ते बोलत होते. या वेळी विकासाच्या मुद्दय़ावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी एका व्यासपीठावर एकत्र येत आमदार अनिल गोटेंविरोधात युती उभारल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

येथील फाशीपूल चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलाचे काम करण्यात आले आहे. त्याचे गुरुवारी सायंकाळी उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. खासदार प्रताप सोनवणे अध्यक्षस्थानी होते. महापौर मंजुळा गावित यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण झाले. या वेळी महापालिकेचे आयुक्त दौलतखान पठाण, नगरसेविका जयश्री अहिरराव, स्थायी समिती सभापती कल्पना महाले, सुफियाबी गनी, इंदुमती वाघ, अतुल सोनवणे, संदीप महाले, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, सुनील नेरकर, संजय जाधव, संजय गुजराथी, डॉ. महेश घुगरी, अनिल दामोदर, कैलास शिंदे आदी उपस्थित होते. राजवर्धन कदमबांडे म्हणाले की, विकासकामांत कोणतेही राजकारण केले जाणार नाही. महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी सहकार्याची भूमिका आहे.

शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेली 124 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर होण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली आहे. त्यानंतर आता राज्य शासनाने योजनेला मंजुरी दिली आहे. आता केंद्र सरकाकडे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी खासदार साोनवणे यांची मदत घ्यावी लागेल. दिल्लीत पक्षर्शेष्ठींनाही यासंदर्भात विनंती करणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अडीचशे कोटींची मागणी केली होती. त्यानुसार दीडशे कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. विकासकामांत अडथळे निर्माण करणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगरसवेक हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, कल्पना महाले यांनी मनोगत व्यक्त केले. महापौर गावित यांनी प्रास्ताविक केले.