आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निकांडातील संशयितांची नावे अद्याप संकेतस्थळावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शासन गतिमान होत असल्याचा दावा एकीकडे प्रशासन करीत असताना वास्तव मात्र वेगळेच आहे. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळातील धुळे महापालिकेतील अधिकार्‍यांच्या नामावलीतून वसुली विभागाच्या अग्निकांडातील संशयित आरोपींची नावे अद्याप वगळण्यात आलेली नाहीत. तसेच हे संकेतस्थळ दोन वर्षांपासून अपडेटही करण्यात आलेले नाही.

शासनाची माहिती जनतेला तत्काळ कळावी. शासनाकडून राबविण्यात येणार्‍या योजना, त्याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी कोण, याची माहिती जनतेला व्हावी यासाठी शासनाचे संकेतस्थळ तयार झाले आहे. या संकेतस्थळावर शासनाच्या विविध विभागांच्या माहितीसह राज्यभरातील जिल्ह्यांचा इतिहास, पर्यटन, धार्मिक स्थळे, जिल्ह्यातील पिके, वातावरण, पर्जन्यमान आदींसह इतरही माहिती प्रसिद्ध करण्यात येते. त्याचा वापर अनेकांकडून करण्यात येतो. त्यासाठी शासनाकडून स्वतंत्र कर्मचारीही नियुक्त करण्यात येतो. शासनाकडून घेण्यात येणारे निर्णय, नव्या योजना आणि अधिकार्‍यांची होणारी बदली आदींसह इतरही माहिती या संकेतस्थळावर वेळोवेळी अपलोड करण्यात येते ; परंतु महापालिकेत चार वर्षांपूर्वी झालेल्या अग्निकांडातील अनेक अधिकार्‍यांची नावे या संकेतस्थळावरील महापालिका या कॉलमातून वगळण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्रशासन किती गतिशील आणि प्रगत आहे हे स्पष्ट होते. जिल्ह्यातील नागरिकांशिवाय राज्यभरातील नागरिकांकडून या संकेतस्थळाचा वापर करण्यात येत असतो. अशा परिस्थितीत माहिती जुनी आणि खोटी असल्यास ती जनतेची शासनाकडून होणारी फसवणूकच ठरते.

संशयित आरोपी नोकरीबाहेर
अग्निकांडातील बहुतांश संशयित नोकरीबाहेर आहेत. यातील काही उपायुक्त दर्जाचे अधिकारी होते. त्यांची बदली झालेली आहे. मात्र, स्थानिक स्तरावरील कर्मचारी निलंबितच आहेत. तरीसुद्धा त्यांची नावे संकेतस्थळावर झळकताना दिसत असल्यामुळे नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सध्या जे अधिकारी महापालिकेत काम करतात त्यांचा नागरिकांशी संपर्क येतो. तर संकेतस्थळावर दुसरेच अधिकारी कार्यरत असल्याचे दिसतात.

नव्या अधिकार्‍यांची नावे नाही
महापालिकेत गेल्या वर्षभराच्या कालावधीत काही अधिकारी नव्याने बदलून आले आहेत. अगदी आयुक्तांपासून चार उपायुक्त आणि इतरही तांत्रिक अधिकारी,कर्मचारी बदलून आले आहेत. मात्र, त्यांची नावे तातडीने अपडेट करून टाकण्याची गरज कुणाला वाटली नाही. त्यामुळे प्रशासन खरोखरच गतिमान आहे का असा प्रश्न निर्माण होतो. अधिकार्‍यांचीच नावे टाकली जात नसतील तर नागरिकांची कामे खरोखरच होत असतील का?.

महापालिकेने अधिकार्‍यांची माहिती कळविणे गरजेचे
महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर असलेल्या धुळे महापालिकेच्या कॉलममधील अधिकार्‍यांच्या नावात झालेले बदल महापालिकेमार्फत प्रशासनाला कळविणे गरजेचे आहे ; परंतु महापालिकेचा एकूणच कारभार पाहता याची जबाबदारी नेमकी कुणाची हेदेखील येथील कर्मचारी, अधिकार्‍यांना माहिती नसल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले. अधिकारी, कर्मचार्‍यांच्या या दुर्लक्षाबद्दल कोणालाही खेद-खंत वाटत नाही.

संकेतस्थळावर यांची नावे
महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर धुळे महापालिकेचे आयुक्त म्हणून अजित जाधव तर उपायुक्त म्हणून नरेंद्र आष्टीकर, गणेश गिरी, शहर अभियंता म्हणून बी. एस. अहिरे, अभियंता म्हणून एस. एस. अग्रवाल आहेत. तसेच अग्निकांडातील संशयित आरोपी बी. बी. गिते हे जकात अधीक्षक, जी. एन.फुलपगारे वसुली अधीक्षक, प्रकल्पाधिकारी असल्याचे दर्शविण्यात आले आहे. ही माहिती महापालिकेच्या कॉलममध्ये पान नंबर आठवर आहे. तर पान नं. 12 वर जी. एन. फुलपगारे, बी. बी. गिते यांना चक्कमाहिती अधिकारी असल्याचे दर्शविण्यात आले आहे.