आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे महापालिका : नामकरणाच्या वादावरून नगरसेवकांमध्ये जुंपली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील कुमारनगर या भागाचे नाव बदलून ‘सिंधूनगर’ असे करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक संजय वाल्हे यांनी केली. त्याला नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आक्षेप घेतल्याने दोघात खडाजंगी झाली. दोन्ही नगरसेवकांनी एकमेकांवर व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केल्याने सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संपूर्ण सभा गोंधळातच पार पडली.

महापालिकेत झालेल्या महासभेसाठी महापौर मंजुळा गावित, प्रभारी आयुक्त हनुमंत कौठळकर, सचिव मनोज वाघ आणि नगरसेवकांची उपस्थिती होती. या वेळी सभागृहासमोर शहरातील विविध भागातील नामकरणाचे विषय अजेंड्यावर होते. त्यात विषयपत्रिकेत विषय क्रमांक 157मध्ये नगरसेवक अनिल वाल्हे यांनी साक्री रस्त्यावरील कुमारनगर या भागाचे ‘सिंधूनगर’ असे नामकरण करण्यात यावे, अशी सूचना केली. त्यावर नगरसेवक प्रकाश छेतिया आणि नरेंद्र परदेशी यांनी कुमारनगरचे नाव कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, अशी मागणी केली. त्यावर वाल्हे यांनी या भागातील नागरिकांनी ‘सिंधूनगर’ नामकरणासाठी पत्र दिल्याचे सभागृहात सांगितले. त्यावर परदेशी, छेतिया म्हणाले अनिल वाल्हे यांनी नागरिकांच्या बनावट सह्या आणल्या आहेत. त्यावर या भागातील विद्यमान नगरसेवकांनी काय विकासकामे केली आहेत, ते माहिती आहे.

इतक्या वर्षात कधी बोलले नाहीत आता बोलत आहात, असे वाल्हे म्हणाले. सिंधू या पवित्र नदीच्या नावावरून ‘सिंधूनगर’ नाव दिले जात आहे, असे सांगतानाच महापालिकेच्या निधीतून महापालिकेच्याच जागा हडप करून मंदिरे उभारल्याचाही आरोप संजय वाल्हे यांनी या वेळी केला. कुमारनगरात पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या विस्थापितांना त्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी ही जागा उपलब्ध करून सर्व सुविधा दिल्या होत्या. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांचे नाव या भागाला कुमारनगर असे देण्यात आले आहे. तर आता नावाचे राजकारण करून नागरिकांच्या भावनेशी खेळले जात आहे. मंदिरासाठी कोणतीही जागा हडप करण्यात आलेली नाही किंवा त्या जागेवर आपले नाव लावण्यात आलेले नाही. या विषयावरील वाद सभागृहात वाढत गेला.

व्यक्तिगत आरोपावरून वाद
कुमारनगरचे नाव बदलून ‘सिंधूनगर’ करण्यावरून वाद झाला. या वेळी नरेंद्र परदेशी यांच्यावर वाल्हे यांनी महापालिकेच्या जमिनी हडप केल्याचा आरोप केला. त्यावर परदेशी यांनी अवैध धंदे करणार्‍यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, असे प्रत्युत्तर दिले. वाल्हे यांच्या अवैध उद्योगाचा सभागृहातच स्पष्ट उल्लेख केला. त्यामुळे मूळ विषय बाजूला राहून आरोप-प्रत्यारोपात सभा रंगली.

गदारोळातच विषयांना मंजुरी
महासभेसमोर नामकरणाच्या 14 विषयांसह इतर विषय होते. मात्र, सुरुवातीलाच नामकरणाचा विषय सुरू झाला. त्यात कुमारनगरच्या विषयावर वाद होऊन गोंधळ सुरू झाला तो शेवटपर्यंत थांबला नाही. गोंधळात विषय मंजूर झाले.