आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळे शहरातील मालमत्ताधारकांकडे कराचे 40 कोटी थकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील मालमत्ताधारकांकडे मालमत्ता करापोटी महापालिकेचे सुमारे चाळीस कोटी रुपये थकले आहेत. ही थकबाकी वसुली करण्याचे मोठे उद्दिष्ट वसुली विभागासमोर आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्मचार्‍यांनी वसुलीचा वेग वाढवण्याचे आदेश आयुक्त दौलतखान पठाण यांनी दिले आहेत.

महापालिकेला पारगमन शुल्क, मालमत्ता कर, पाणीपट्टी, विविध व्यापारी संकुलांच्या भाड्यातून दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न प्राप्त होते. शासनाच्या आदेशानुसार जकात बंद झाली असून, स्थानिक संस्था करामुळे किती उत्पन्न मिळेल हे आताच सांगणे कठीण आहे. जकात बंद होण्यापूर्वी विविध जकात नाक्यांवर गेल्या एक ते दीड वर्षापासून वसुली विभागातील अनेक कर्मचारी कार्यरत होते. त्याचा परिणाम मालमत्ता कर वसुलीवर झाला आहे. त्यानंतरही गेल्या वर्षी मालमत्ता करापोटी सुमारे 18 कोटी वसूल करण्यात आले होते.

मालमत्ता करापोटी शहरातील मालमत्ताधारकांकडे सुमारे चाळीस कोटी रुपये थकले आहेत. त्यात मागील आणि चालू वर्षाच्या थकबाकीचा समावेश आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे मोठे उद्दिष्ट वसुली विभागासमोर आहे. जकात बंद झाल्याने जकात नाक्यावरील सर्व कर्मचारी आता पुन्हा वसुली विभागात रुजू झाले आहेत. या विभागातील कर्मचार्‍यांची संख्या आता वाढली आहे.

या विभागात सद्य:स्थितीत तीस ते चाळीस कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचार्‍यांना वसुलीच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या आठ ते दहा दिवसांत मालमत्ताधारकांच्या याद्या बनविण्यासह त्यांना कर वसुलीच्या नोटिसा देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर 1 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष वसुलीला प्रारंभ होईल. प्रत्येक महिन्यात सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट निश्चित झाले आहे.

सद्य:स्थितीत प्रत्येक कर्मचारी दिवसाला साधारणपणे पन्नास हजारांची वसुली करत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. ही घडी बसविण्यासाठी आयुक्त दौलतखान पठाण यांच्यातर्फे वसुली विभागातील कर्मचार्‍यांना वसुलीचा वेग वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वसुली कर्मचार्‍यांना ‘टॅब’
आगामी काळात वसुली विभागाचे पूर्णपणे संगणकीकरण होणार आहे. त्यानंतर मालमत्ता कराची वसुली करणार्‍याला टॅब देण्यात येणार आहे. हे कर्मचारी वसुली केल्यावर तत्काळ ऑनलाइन मालमत्ताधारकांच्या खात्यावर कर जमा झाल्याची नोंद करतील. त्यानंतर ही नोंद महापालिकेतील मुख्य सर्व्हरला होईल. त्यासाठी सॅप तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.