आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांशी घातली हुज्जत, रेटारेटी; महापाैर अडकल्या चाळीस मिनिटे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ आणि कर्मचाऱ्यांच्या धटिंगशाहीचा प्रत्यय शुक्रवारी घरकुल योजनेच्या अर्जवाटपावेळी पुन्हा आला. नागरिकांनी केलेली गर्दी, बाहेर विखुरलेल्या अवस्थेत लावलेली वाहने यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. अर्ज-चलनवाटपासाठी पुढाकार घेऊन खिडकीपर्यंत गेलेल्या महापाैरही तब्बल ४० मिनिटे या खोलीत अडकल्या. गर्दीच्या लोटामुळे त्यांना बाहेर पडणे कठीण झाले. यानंतर चलन हिसकावणे, पोलिसांशी हुज्जतबाजी आणि रांग तोडून रेटारेटी सुरू झाली. यानंतर महापौर महाले यांच्या प्रयत्नांमुळे आता सोमवारपासून दोन टेबल अर्ज-चलनवाटपासाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात अाला. दरम्यान, मनपाकडे पाच हजार अर्ज दाखल झाले अाहेत. प्रत्येकी ५० रुपयांप्रमाणे यामधून मनपाला अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले अाहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेतून गृह खरेदी बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. याेजनेचे तब्बल पाच हजार अर्ज महापालिकेत आले आहेत. अर्जापूर्वी चलन घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी गुरुवारपेक्षाही अधिक गर्दी महापालिकेच्या आवारात दिसून आली. थेट प्रवेशद्वारापर्यंत महिला-पुरुषांच्या रांगा लागल्या होत्या. काहींनी तर लहान मुले, विद्यार्थिनी घरातील वयस्कर व्यक्तींनाही सोबत आणले होते. चलन भरणे आणि अर्ज घेण्याच्या ठिकाणीही अशीच गर्दी होती. त्यामुळे सकाळी अकरानंतर पालिकेच्या आवारात प्रवेश करणेही कठीण झाले होते, तर चलन मिळणाऱ्या खिडकीजवळ रांगाएेवजी काहींनी गर्दी केली होती. नियम तोडून चलन घेण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे गोंधळ उडाला. हा प्रकार पाहिल्यानंतर सकाळी ठीक ११.५० वाजता महापौर कल्पना महाले या आल्यात. अधिकारी कर्मचारी यांना त्यांनी काही सूचना केल्यात. या वेळी त्यांच्यासोबत असलेले माजीस्थायी समिती अध्यक्ष चंद्रकांत सोनार, सुनील सोनार, मनोज मोरे, उपायुक्त रवींद्र जाधव आदी होते. प्रत्येकाला चलन मिळेल; रांगेत येऊन शांतता राखा, असे आवाहनही त्यांनी केले. एवढेच नव्हे, तर दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी त्या स्वत: चलनवाटप होणाऱ्या खिडकीपर्यंत गेल्या. आत जाऊन त्यांनी चलनवाटपासाठी पुढाकार घेतला. संबंधितांना सूचनाही दिल्या. त्या बाहेर येताना मात्र दरवाजाजवळ प्रचंड गर्दी झाली. महिला पुरुषांच्या रांगेमधील अनेक जण दरवाजापर्यंत आले. याशिवाय मागून रेटारेटी सुरू झाली. त्यामुळे महापौर महाले या खोलीत अडकल्यात. दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी दाराजवळील गर्दी कमी झाल्यामुळे त्यांना बाहेर येता आले, तर दुसरीकडे कर्मचाऱ्याकडून चलन ओढण्यात येत होते. खिडकीपर्यंत रांगेत येऊन चलन घेऊन परतणाऱ्यांचे अर्ज-चलनही फाटले. काही जणांनी तर पोलिसांशीही हुज्जतबाजी केली. मनपा कर्मचारीप्रमाणे पोलिसांवरही धावून जाण्याचा प्रयत्न झाला. काही नगरसेवकांनी समजूत घालूनही नागरिक एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या सर्व गोंधळात चलन संपल्याचे कर्मचाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले. यानंतरही अनेक जण मनपाच्या आवारात थांबले होते. दुपारनंतर गर्दी कमी झाली होती.

कर्मचाऱ्यांचे ‘डोळे बंद’ धोरण
दुसरीकडे बाहेर वाहनांमुळे गुरुवारपेक्षा अधिक गर्दी दाटली. त्रिभुवन मंगल कार्यालय ते झाशीची राणी चौकापर्यंत वाहतूक खोळंबली. वाहनांच्या गराड्यात शाळेची वेळ होऊनही विद्यार्थी-विद्यार्थिनी अडकल्यात. प्रशासनाने गर्दीसाठी पोलिस बोलावले असले तरी, वाहतूक ठप्प होण्याबद्दल कोणतीच व्यवस्था केली नव्हती. शिवाय पालिकेचे सात ते आठ कर्मचारी गेटजवळ उभे राहून वाहने आत जाऊ देत नव्हते; परंतु वाहने लावण्याबाबत काही सूचना देत नव्हते.

चलन देण्यासाठी नियोजन...
^योजनेचे चलन देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत सूचित केले आहे. सोमवारपासून गर्दी होणार नाही नागरिकांना चलन-अर्ज मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनीही गर्दी-रेटारेटी करू नये. सर्वांना चलन देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. -कल्पनामहाले, महापौर

थांबा, आम्ही देतो चलन
चलन वाटपखिडकी जवळ गर्दी दूरपर्यंत रांगा लागल्या असताना काही नगरसेवकही आले. त्यांनी खाली बसण्याचे आवाहन केले. शिवाय स्वत: गर्दीतून मार्ग काढत अनेक चलन घेऊन बाहेर आलेत. गर्दी-रेटारेटी करू नका; थांबा, आम्ही देतो चलन, असे सांगून त्यांनी आवाहन केले. यामुळे घोळक्याने नागरिक विभाजित होऊन नगरसेवकांकडून चलन घेत होते; परंतु चलनांची ओढाओढी या ठिकाणीही दिसून आली. त्यामुळे लक्ष द्यावे तरी कुठे? रांगेकडे की घोळक्याकडे? असा प्रश्न पोलिसांना पडला.

बातम्या आणखी आहेत...