आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचे अंदाजपत्रक दोनशे कोटींपेक्षा जास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- महापालिकेचे सन २०१६-१७ या अार्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मार्च महिन्याच्या आत महासभेत मंजूर झाले पाहिजे. त्यापूर्वी २८ फेब्रुवारीच्या आत अंदाजपत्रकाला स्थायी समितीची मंजुरी मिळणे बंधनकारक असते. त्यामुळे प्रशासनाने अंदाजपत्रक तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी १९६ कोटींचे अंदाजपत्रक सादर झाले होते. यंदा उत्पन्नवाढीसाठी कर वाढवले जाण्याची शक्यता असल्याने अंदाजपत्रक २०० कोटींवर जाऊ शकते.

महापालिकेचा कारभार चालवण्यासाठी अंदाजपत्रक अतिशय महत्त्वाचे असते. वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली जाते. या तरतुदीनुसारच निधी खर्च करावा लागतो. अंदाजपत्रकाला दरवर्षी मार्चअखेरपर्यंत महासभेत अंतिम मंजुरी मिळणे अपेक्षित असते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रक तयार करण्यासाठी तयारी सुरू केली अाहे. त्यासाठी महापालिकेचे लेखापरीक्षक माधव सराई यांनी महिनाभरापूर्वी सर्व विभागप्रमुखांना पत्र दिले होते. त्यांनी २०१५-१६च्या अंदाजपत्रकात कोणत्या विभागासाठी किती तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी प्रत्यक्षात किती रक्कम प्राप्त खर्च झाली याची माहिती मागविली होती. त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी लेखापरीक्षक माधव सराई यांच्यासह अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय कदम, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, हनुमंत कौठळकर, सहायक आयुक्त हेमलता डगळे, लेखा विभागातील बी. एस. रनाळकर, अभियंता कैलास शिंदे यांच्याशी चर्चा केली. बैठकीत िवभागप्रमुखांकडून माहिती घेण्यात आली. खर्च उत्पन्नाचा अंदाज घेण्यात आला. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन वास्तव अंदाजपत्रक तयार करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना या वेळी देण्यात आली.

उत्पन्नवाढीतून वाढेल अंदाजपत्रक
अंदाजपत्रक तयार करताना महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी करात वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांमधून निधी मिळवण्याचा प्रयत्न आगामी अार्थिक वर्षात केला जाणार आहे.

१३० कोटी खर्च
महापालिकाप्रशासनाने सन २०१५-१६मध्ये १९६ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. तर दुसरीकडे जानेवारी महिन्यापर्यंत महापालिकेचा जवळपास १३० काेटी रुपयांपर्यंत खर्च झाला असल्याची माहिती देण्यात आली.