आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule News In Marathi, Apartment Security, Divya Marathi

अपार्टमेंटची सुरक्षा वार्‍यावर; सुरक्षारक्षक नेमण्यास ‘खो’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील विविध भागात अपार्टमेंट संस्कृती वाढली आहे. अपार्टमेंटमध्ये असलेल्या फ्लॅटच्या बांधकामाबाबत नागरिक जेवढी सतर्कता दाखवतात तेवढी सतर्कता अपार्टमेंट सुरक्षेच्या दृष्टीने दाखवत नसल्याची स्थिती आहे. कारण शहरातील अनेक अपार्टमेंटमध्ये सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसून आले.


शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे जमिनीच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे स्वतंत्र बंगल्याऐवजी आता अनेक जण मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अपार्टमेंट संस्कृती रुजली आहे. नागरिक फ्लॅट खरेदी करताना मोठय़ा प्रमाणावर सतर्कता दाखवितात. मात्र, तेथे राहण्यास गेल्यावर अपार्टमेंटच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थिती आहे.


शहरातील अनेक अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सुरक्षितता धोक्यात आली आहे. प्रत्येक जण घरात दरवाजे बंद करून स्वत:पुरती योग्य ती काळजी घेत असले तरी दिवसभरात अपार्टमेंटमध्ये कोण येते-जाते याची कोणतीही नोंद ठेवली जात नाही. अनेक अपार्टमेंटमध्ये दिवसभर महिला एकट्याच घरी असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. अपार्टमेंटची सुरक्षा वार्‍यावर असल्याने अनेक वेळा चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. अपार्टमेंटमध्ये देखभालीसाठी सामूहिक खर्च केला जातो ; परंतु या खर्चात सुरक्षेला कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही.


सुरक्षारक्षकांचा फायदा काय
अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक असल्यास कुणीही विनापरवानगी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करू शकत नाही. सुरक्षारक्षक असल्यास अपार्टमेंटमध्ये येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाची नोंद तो करेल. त्यामुळे एखाद्या वेळेस अनुचित प्रकार घडल्यास त्याचा तातडीने छडा लावता येईल. त्याचबरोबर वाहनामधील पेट्रोलसह वाहने चोरीस जाण्याचे प्रकार बंद होतील. अपार्टमेंटमध्ये अनोळखी व्यक्ती प्रवेश करू शकणार नाही.

एखाद दुसर्‍या ठिकाणी सुरक्षा
शहरातील विविध भागात असलेल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावण्यात येणार्‍या वाहनामधील पेट्रोल चोरीच्या घटना घडल्या आहेत. एकीकडे एटीएम, बँक, खासगी, शासकीय कार्यालये, कंपन्यांमध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येते. त्यामानाने अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक कमी प्रमाणात नेमण्यात येतात. सुमारे 30 टक्के अपार्टमेंटमध्येच सुरक्षारक्षक आहेत.

एटीएम, बँक, विविध शासकीय, खासगी कार्यालयात सुरक्षारक्षक नेमण्यासाठी अनेक जण येतात. दुसरीकडे अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक नेमण्यासाठी अतिशय कमी जण येतात. अनिल पाटील, सुरक्षा एजन्सी, संचालक

अपार्टमेंट सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न सर्वांच्या समन्वयातून सोडविला गेला पाहिजे. सुरक्षारक्षक नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा वाहनामधील पेट्रोल चोरी जाते. काही वेळा वाहनांचे पार्ट गायब होतात. फेरीवाले व अनोळखी व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक असणे काळाची गरज आहे. राजेंद्र पाटकर, सदनिकेतील रहिवासी