आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाचा तपास दिल्लीत; दुसर्‍याचा गल्लीपर्यंतच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - येथील सोने-चांदीच्या विक्रेत्याला दहा लाखांचा गंडा घातल्याचा आरोप असलेल्या सुनील उपाध्येला आझादनगर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली ; तर देवपुरातील घरफोडीचा तपास लागलेला नाही. एकीकडे संशयिताच्या शोधासाठी दिल्ली गाठणारे आझादनगर पोलिस आणि दुसरीकडे घरफोडीचा तपास गल्लीपर्यंत सीमित ठेवणार्‍या देवपूर पोलिसांविषयी नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.


येथील आग्रारोड परिसरातील दिव्य ज्वेलर्सचे संचालक सरदार चौधरी यांच्या तक्रारीनुसार सुनील दशरथ उपाध्ये याला दागिने तयार करण्यासाठी 10 लाख पाच हजारांचे सुमारे 336 ग्रॅम सोन्याचे तुकडे दिले होते. त्यानंतर सुनीलने दागिने तयार करून न देता तो धुळयातून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद होते. त्यावरून आझादनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 408, 420 नुसार गुन्हा (45/2014) दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एम. आर. घुणावत यांचे पथक सुनीलच्या शोधासाठी दिल्लीला गेले होते. सुनील हा उत्तर प्रदेशातील फैजाबादचा राहणारा असून, गेल्या अनेक वर्षांपासून तो धुळयातील वाखारकरनगरात राहतो. त्याची एक बहीण दिल्ली येथे राहते. तिच्या घरून सुनीलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला घेऊन उपनिरीक्षक घुणावत यांच्यासह पथक गुरुवारी पहाटे धुळयात परतले. याप्रकरणी सुनीलला अटक करण्यात आली आहे. सकाळी 6.45 वाजता तशी नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.


डॉक्टरांकडे घरफोडी
अन्य घटनेत प्रोफेसर कॉलनीत राहणारे डॉ. नंदकिशोर सुधाकर पिंपळीकर (27) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी 30 हजारांची रोकड, गॅस सिलिंडर, आरओ सिस्टिमसह सुमारे 33 हजारांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत पोलिसांचा तपास अजूनही केवळ गल्लीपर्यंत सीमित आहे. याप्रकरणी प्राथमिक स्तरावर चौकशी व परिसरातील नागरिकांकडे माहिती घेण्याचा पोलिस प्रयत्न करत असल्याची ओरड होत आहे. घटनास्थळी त्वरित जाण्याची पोलिसांनी तसदी घेतली नाही.


पोलिसांचा दुटप्पीपणा
सराफाच्या तक्रारीनंतर थेट दिल्लीपर्यंत जाऊन तपास करणारे आझादनगर पोलिस आणि डॉक्टरांकडे झालेल्या चोरीनंतरही तपासाची सूत्रे वेगात न हलविणारे देवपूर पोलिस यांच्या कार्यपद्धतीत विरोधाभास लक्षात येतो. यातून पोलिस तपासात दुटप्पीपणा करत असल्याचे चित्र निर्माण होऊ पाहत आहे. त्यामागील कारण व ‘अर्थ’ मात्र पोलिसांनाच ठाऊक असले तरी याबाबत वरिष्ठदेखील संबंधितांना विचारणा करीत नाहीत.


अनेक गुन्ह्यांचा तपास अद्यापही रखडलेलाच
सद्य:स्थितील अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. गुन्ह्यांची उकल होत नसल्याने तपास अधिकार्‍यांना वरिष्ठांकडून वेळोवेळी खडे बोलही ऐकावे लागतात. संबंधित पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणी वेळी वरिष्ठ अधिकारी याबाबत जाब विचारतात. त्या वेळी काही तपास अधिकारी गैरहजर राहण्यासाठी क्लृप्त्या लढवितात. काही वेळा वैद्यकीय रजेचे खोटे कारणही पुढे केले जाते. असले प्रकार पोलिसांच्या पाहण्यात आहे ; परंतु आता वरिष्ठ अधिकारीदेखील तपास अधिकारीऐवजी संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला तपासाविषयी विचारणा करताना दिसतात.