आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे पंचायत समिती: युती, राष्ट्रवादी, अपक्षांचा काँग्रेसला शॉक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धुळे तालुका पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्षासह स्व. द. वा. पाटील गटाच्या अपक्ष सदस्यांनी हातमिळवणी करत सत्ता प्राप्त केली. त्यामुळे काँग्रेसचे रोहिदास पाटील यांच्या जवाहर गटाला मोठा धक्का बसला आहे. विरोधक एकत्र आल्याने काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य असतानाही त्यांच्यावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. पंचायत समितीच्या सभापतिपदी नगाव गणाच्या अपक्ष सदस्या ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांची तर उपसभापतिपदी शिवसेनेचे गरताड गणातील सदस्य सखाराम त्र्यंबक पाटील यांची निवड झाली.

धुळे तालुका पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीसाठी शनिवारी प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती झाली. त्यानुसार काँग्रेसचे गुलाबराव कोतेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे यांनी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी प्रत्येकी तीन अर्ज घेतले. त्यानंतर अपक्ष सदस्या ज्ञानज्योती भदाणे, शिवसेनेचे सखाराम पाटील, नीता परशुराम देवरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिवाजी शिंदे हे दोन्ही 11 वाजून 34 मिनिटांनी दोन नव्या कोर्‍या कारमधून अर्ज घेण्यासाठी आले. त्यांनी प्रत्येकी एक-एक अर्ज घेतला. त्यानंतर दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनी ज्ञानज्योती भदाणे आणि सखाराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ते अर्ज भरून इमारतीच्या जिन्यावरून खाली उतरत असतानाच काँग्रेसचे सदस्य अर्ज भरण्यासाठी आले.

काँग्रेसतर्फे सभापतिपदासाठी सुवर्णा विजय पाटील यांनी तर उपसभापतिपदासाठी शिरधाने प्र. नेर येथील अपक्ष उमेदवार दिनेश अशोक भदाणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर दुपारी 3 वाजता पीठासीन अधिकारी के. बी. राजगुरू यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीत नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा झाली. या वेळी सुरुवातीला सभापतींची निवड करण्यात आली. हात उंचावून झालेल्या मतदान प्रक्रियेत ज्ञानज्योती भदाणे यांच्या बाजूने 18 तर सुवर्णा पाटील यांच्या बाजूने 16 सदस्यांनी हात उंचावले. सभापतिपदी भदाणे यांची दोन मतांनी निवड झाली. याच पद्धतीने उपसभापतिपदाची निवड करण्यात आली. सखाराम पाटील आणि दिनेश भदाणे यांच्यात लढत झाली. या लढतीत सखाराम पाटील यांना 18 तर दिनेश भदाणे यांना 16 मते मिळाली. त्यामुळे सभापतिपदी सखाराम पाटील यांची निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी राजगुरू यांनी केली.

‘गंगामाई’च्या वाहनातून आले सदस्य
निवडणुकीसाठी दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी 10 ते 15 गाड्यांच्या ताफ्यासह गंगामाई संस्थेच्या मिनी बसमधून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि स्व. द. वा. पाटील गटाचे अपक्ष सदस्यांचे पंचायत समितीत आगमन झाले. या वाहनात पुढील बाजूस शिवसेनेचे आमदार प्रा. शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपस्थित होते. किरण शिंदे, मनोहर भदाणे हे स्वतंत्र वाहनातून आले. त्यानंतर पाच मिनिटांनी काँग्रेसच्या सदस्यांचे सभागृहात आगमन झाले. काँग्रेसचे सदस्य डाव्या बाजूस तर इतर सर्व विरोधी बाजूचे सदस्य पंचायत समिती सभागृहात उजव्या बाजूस बसले होते.

भदाणे राष्ट्रवादीच्या सहयोगी सदस्या
अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार्‍या स्व. द. वा. पाटील गटाचे पंचायत समितीत तीन आणि जिल्हा परिषदेत दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यातील नगाव गणातील ज्ञानज्योती भदाणे यांना सभापतिपद देण्यात आले. त्यांनी राष्ट्रवादी भवनात जाऊन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची भेट घेत पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्याची माहिती त्यांचे पती मनोहर भदाणे यांनी दिली. दरम्यान, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची तयारी सर्व विरोधकांनी आठ दिवसांपासूनच सुरू केली होती. विजय निश्चित असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि द.वा.पाटील गटाच्या सदस्यांनी निकालापूर्वीच जल्लोषाची तयारी सुरू केली होती.

आतापर्यंत पंचायत समितीत सत्ता असलेल्यांनी विकास करताना भेदभाव केला. या निवडणुकीत तालुक्यातील परिवर्तनाच्या लाटेत राष्ट्रवादीला मतदारांनी साथ दिली. त्यात पक्षाचे सहयोगी सदस्य झालेल्या ज्ञानज्योती भदाणे यांना सभापतिपदाची संधी मिळाली आहे. विकासाच्या मुद्दय़ावर सर्व जण एकत्र आलो आहोत. तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न होतील. किरण पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष

सासर्‍यांच्या पुण्याईमुळेच सभापतिपदाची संधी मिळाली. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार प्रा. शरद पाटील, आमदार जयकुमार रावल, मनोहर भदाणे आदी सर्वांचे सहकार्य लाभले. आगामी काळात ग्रामीण भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासह नागरिकांना मूलभूत गरजा पुरवण्याचा प्रयत्न असेल. सर्वांना सोबत घेऊन विकास कामे केली जातील. ज्ञानज्योती भदाणे, नूतन सभापती

विजय मिळविल्यानंतर काय म्हणाले नेते अन् पदाधिकारी
तालुक्यातून माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या जवाहर गटाचे वर्चस्व संपविण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे. त्याची सुरुवात पंचायत समितीच्या सभापतिपदापासून करण्यात आली आहे. यापुढेही सर्व मिळून कामे केली जातील. सर्वांना सोबत घेत धुळे तालुक्यात विकास कामे करण्यावर भर देण्यात येईल. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहे. मनोहर भदाणे, गटनेते

हे ठरले परिवर्तनाचे शिलेदार
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रथमच काँग्रेसच्या हातातून शिवसेना, भाजप युतीने सत्ता मिळवत पंचायत समितीत परिवर्तन घडवले होते. त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा काँग्रेसने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला ; परंतु तो फसला होता. तर यंदा काँग्रेसला 34 पैकी 15 जागांवर विजय मिळाल्याने त्यांचा सभापती होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती ; परंतु शिवसेनेचे आमदार प्रा. शरद पाटील, प्रा. अरविंद जाधव, सुधीर जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, किरण शिंदे, मनोहर भदाणे यांनी राजकीय खेळी करीत कॉँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले.

काँग्रेसला आत्मविश्वास नडला
पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला 34 पैकी सर्वाधिक 15 तर राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या होत्या. सभापती निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळेल आणि आपलीच सत्ता येईल असा आत्मविश्वास काँग्रेसला होता ; परंतु प्रचारात काँग्रेसने व्यक्तिगत पातळीवर टीका केली. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मने दुखावली गेली. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत रोहिदास पाटील यांच्या जवाहर गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची वेळ आली.