आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समितीत या, चिखल, पाणी तुडवत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धुळे तालुका पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामासाठी दोन कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानंतरही बांधकामाला मुहूर्त सापडलेला नाही. प्रशासकीय व राजकीय इच्छाशक्तीअभावी हे काम रखडले आहे. त्याचा फटका पंचायत समितीतील कर्मचार्‍यांना आणि बाहेर गावाहून येणार्‍या नागरिकांना बसत आहे. पावसामुळे पंचायत समितीच्या आवारात मोठय़ा प्रमाणात पाणी साचून चिखल जमतो. त्यामुळे नागरिकांना चिखलातून रस्ता काढत गलिच्छ पायांनीच कार्यालयात यावे लागते. संपूर्ण पावसाळा हा त्रास सहन करावा लागतो. आता तर इमारतही गळकी झाली आहे. त्यामुळे रेकॉर्ड खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

धुळे तालुक्यातील 168 गावे आणि 141 ग्रामपंचायतींचा कारभार या संस्थेतून चालतो. मात्र, पंचायत समितीच्या कार्यालयासह आवाराची दुरवस्था झाली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी इमारतीच्या नूतनीकरणासाठी ग्रामपंचायत विभागाने सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी दोन कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानंतरही या इमारतीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. दुसरीकडे नवीन इमारतीचे बांधकाम होणार असल्याने जुन्या इमारतीत कोणतीही दुरुस्ती केली जात नाही. पंचायत समितीतील स्वच्छतागृहाची मोठय़ा प्रमाणावर वाताहत झाली आहे. पावसामुळे कार्यालयाच्या प्रांगणात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले आहे. या पाण्यातून वाट काढून अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना कार्यालयात जावे लागते. कार्यालयातील काही विभागाच्या दरवाजांची दुरवस्था झाली आहे. कचरा फेकण्यासाठी जागा नसल्याने जागोजागी कचर्‍याचे ढीग निर्माण झाले आहेत. इमारतीच्या प्रत्येक भिंती पिचकार्‍यांनी रंगल्या आहेत. इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी झाल्यावर नवीन इमारत होणार असल्याचे उत्तर देऊन वेळ मारून नेली जात आहे.

इमारत झाली पुरातन
सध्या अस्तित्वात असलेली पंचायत समितीची इमारत कै. दत्तात्रय वामन पाटील हे सभापती असतानाच्या कार्यकाळातील म्हणजे 1967 ते 72 मध्ये बांधण्यात आली आहे. ही इमारत दहा हजार चौरस फूट जागेवर आहे. मुख्य इमारतीचे बांधकाम जीर्ण झालेले आहे. कार्यालयाचा दर्शनी भाग सोडला तर सर्व बाजूंनी नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत.

नवीन इमारतीला मुहूर्त कधी?
नवीन इमारतीसाठी आमदार शरद पाटील यांच्या प्रयत्नातून दोन कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचा दावा होत आहे. पंचायत समितीत शिवसेनेचीच सत्ता असून, निधी उपलब्ध असताना नवीन इमारतीच्या बांधकामास टाळाटाळ होत आहे.सत्तासंघर्षामुळे प्रशासनदेखील याविषयात फारसे स्वारस्य दर्शवत नसल्याचे चित्र आहे.

स्थलांतरासाठी इमारत नाही
नवीन इमारतीचे बांधकाम होईपर्यंत तात्पुरते कामकाज करण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे नवरंग पाण्याच्या टाकी जवळील जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जोपर्यंत या इमारतीचे स्थलांतर होत नाही तोपर्यंत बांधकाम सुरू होणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

तहसीलच्या धर्तीवर निर्णय घ्या
शहरातील तहसील कार्यालयाचे दीड ते दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले. जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत बांधण्यापूर्वी तहसील कार्यालय देवपुरात हलवण्यात आले होते. तसाच निर्णय पंचायत समितीच्या बाबतीत घेतला पाहिजे.