आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे एलसीबीत अधिकारी-पोलिस कर्मचा-यांत हमरीतुमरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - नेहमीच चर्चेत राहणा-या धुळे एलसीबी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये फ्री स्टाइल हमरीतुमरी झाल्याचा प्रकार काल बुधवारी रात्री घडला आहे. याबाबत इतरांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद शमला. वादाचे कारण ‘अर्थ’पूर्ण होते किंवा कसे, हे स्पष्ट झाले नाही.
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात एलसीबी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. असे असताना या विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कॉन्स्टेबल यांच्यात वाद झाला. सुरुवातीला वरच्या आवाजात बोलण्यापर्यंत वाद सीमित होता. त्यानंतर परस्परांना एके री शब्दात दमदाटी करण्यात आली. दोघांच्या रागाचा पारा वाढल्यामुळे दोन्हीकडून शिवीगाळही करण्यात आली, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी पोलिस कर्मचा-याने दिली. तावातावात अधिकारी आणि कर्मचारी दोन्ही परस्परांवर धावूनही गेले. दोघांचा आवाज वाढल्यामुळे एलसीबीमधील अन्य कर्मचारी धावून आले. काहींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नदेखील केला.
दोन दुय्यम दर्जाचे अधिकारी देखील दुस-या दालनातून आले. त्यांनी हस्तक्षेप करीत वाद थांबविला. या घटनेतील कॉन्स्टेबलला दुसरीकडे नेण्यात येऊन त्यांची समजूत काढण्यात आली. तथापि, दोघांच्या तोंडाचा पट्टा बराचवेळ सुरू होता.
अधिकारी काय म्हणतात ? - यासंदर्भात पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, असल्या प्रकाराबाबात अद्याप आपल्याकडे तक्रार आलेली नाही. तर पोलिस निरीक्षक प्रताप पवार यांनी यासंदर्भात अधिक न बोलण्याचा पवित्रा घेत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
शिंदखेडा, साक्रीची पुनरावृत्ती - शिंदखेडा पोलिस ठाण्यात सुमारे पाच वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्या वेळी वरिष्ठ अधिकारी आणि दुय्यम दर्जाच्या अधिकारी यांच्यातील वाद परस्परांवर खुर्ची फेकण्यापर्यंत गेला होता. तर सुमारे तीन वर्षांपूर्वी साक्री पोलिस ठाण्यात अशाच पद्धतीने वाद झाला होता. याबाबत वरिष्ठांकडून चौकशीही झाली होती. या दोन्ही घटनेनंतर संबंधित अधिका-यांची मात्र बदली झाली होती.