आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाॅलिटेक्निक हाेणार बंद; नवीन अभियांत्रिकी काॅलेजची वाट माेकळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे लवकर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रूपांतर होणार आहे. शासनाच्या निर्णयानंतर तसे पत्र गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला देण्यात अाले अाहे. त्यानुसार आवश्यक माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. नव्याने हाेणाऱ्या या अभियांत्रिकी महाविद्यालयांत दरवर्षी २४० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. अभियांत्रिकीमध्ये करिअर करणाऱ्यांसाठी ही सुखद बातमी असली तरी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज बंद हाेणार असल्यामुळे दरवर्षी किमान ३१५ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी खासगी कॉलेज अथवा इतर मार्ग शोधावे लागणार आहेत.
देवपुरातील प्रभातनगरला लागून जीपीटी अर्थात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे. सन १९५४मधील स्थापना सन १९६०मध्ये शासनाकडे वर्ग करण्यात आलेल्या या शैक्षणिक संस्थेतून अनेकांनी शिक्षण घेतले. या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार आहे. शासनाने तसा निर्णय नुकताच घेतला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार धुळयासह सहा जिल्ह्यांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार आहे. त्यासाठी परिषदेच्या मानांकनानुसार जीपीटीमधील साधनसामग्री, विस्तार, इमारती, मनुष्यबळ आणि तत्सम बाबींचा विचार करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत शहरातील हे अभियांत्रिकी महाविद्यालय राहील. त्याची प्रवेशप्रक्रिया पुढील वर्षापासून सुरू हाेईल. मात्र, या निर्णयाबाबत जीपीटीला कळवण्यात आले आहे. त्यानुसार आवश्यक माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. सुमारे ५८ एकरमध्ये विस्तारलेल्या जीपीटीमध्ये प्राचार्य प्राध्यापक यांच्यासह सुमारे २९ जणांचा स्टाफ कार्यरत आहे. तर दरवर्षी ३१५ विद्यार्थी प्रवेश घेतात. तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमातील सुमारे ९०० विद्यार्थी सध्या येथे प्रविष्ट आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर या ठिकाणी दरवर्षी २४० विद्यार्थ्यांना विविध शाखेला गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या धुळे, जळगाव नंदुरबारमधील विद्यार्थ्यांसाठी ही सुखद बाब असली तरी या निर्णयामुळे मात्र शहरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मात्र बंद होणार आहे. त्यामुळे दरवर्षी जीपीटीला प्रवेश देताना स्थानिक ७० टक्क्यांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यात प्रवेशासाठी मार्ग शोधावे लागणार आहेत. याशिवाय इतर जिल्ह्यात ३० टक्क्यांच्या निकषानुसार त्यांना प्रवेशप्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे खासगी डिप्लोमा, कॉलेजला प्रवेश घ्यावा लागणार आहे.

हजार ६२० विद्यार्थ्यांना प्रवेश
एआयसीटीईच्या मानांकनानुसार धुळे, यवतमाळ, रत्नागिरी, लातूर, सोलापूर आणि जालना या ठिकाणी सहा नवीन अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यातून दरवर्षी एक हजार ६२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. आकडेवारी पाहता धुळे, जालना, यवतमाळ, लातूर या ठिकाणी प्रत्येकी २४० तर रत्नागिरी सोलापूर येथे प्रत्येकी ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यासाठी संपूर्ण राज्यात सुमारे ४३२ प्राचार्य, सहयोगी-सहायक प्राध्यापकांची पदे रूपांतरित तसेच नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत.

चार अभ्यासक्रम, ६४ पदांची निर्मिती
अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रिशियन अशा चार शाखांना प्रत्येकी ६० या प्रमाणे एकूण २४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय एक प्राचार्य, सहयोगी, ४२ सहायक प्राध्यापक यांची पदे रूपांतराने निर्माण केली जातील. तर सात प्राध्यापक सात सहयोगी प्राध्यापकांची पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत. प्राचार्यांसह ६४ जणांचा स्टाफही भरला जाणार आहे. सध्या जीपीटीमध्ये कार्यरत असलेले काही प्राध्यापकांची सेवा आणि पदवीवरून त्यांचे समायोजन केले जाईल, असे चित्र आहे.

विद्यार्थी हिताचा विचार
^शासन निर्णयाचेपत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार आवश्यक माहिती संकलित केली जात आहे. निर्धारित वेळ फॉरमॅटमध्ये संपूर्ण माहिती वरिष्ठांना पाठविली जाणार आहे. त्यानंतर समिती येऊन पुन्हा पाहणी करू शकते; परंतु पुढील प्रक्रियेबद्दल अद्याप आदेश आलेले नाही. त्यामुळे निश्चित सांगता येणार नाही; परंतु ही प्रक्रिया अभियांत्रिकी महािवद्यालय होण्याकडे पाऊल टाकणारी आहे. याचा फायदा जिल्ह्यातून बाहेरील शहरात जाणाऱ्यांना होईल. स्थािनक स्तरावर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. -आर.के. चौधरी, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, धुळे.

डिप्लाेमाची फरफट नको
५८ एकरमध्ये विस्तारलेल्या जीपीटी कॉलेजचे अभियांत्रिकीमध्ये रूपांतर झाल्यानंतरही अनेक वर्गखोल्या इतर सुविधा राहणार आहेत. त्यामुळे या शासकीय वास्तूचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा यासाठी अभियांत्रिकीसोबत डिप्लोमा कॉलेजही याच वास्तूत असावे, असे विद्यार्थी पालकांना अपेक्षित आहे. शिवाय जळगाव इतर जिल्ह्यात एकाच संस्थेत अभियांत्रिकी डिप्लोमाचे शिक्षण दिले जात असताना शहराचाही त्यानुषंगाने विचार होणे गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...