आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाची हजेरी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - पावसाळा सुरू झाला असून, जिल्ह्यास दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शहरासह परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 31 मे रोजी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्या वेळी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शिरपूर, धुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर अधूनमधून जिल्ह्यातील चारही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात जून महिन्यातील आठ दिवसांत 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतरही वातावरणात उकाडा कायम आहे. शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पावसाच्या आशेवर आता शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. शेतकर्‍यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत.

त्याचबरोबर बियाणे, खते विक्रेत्यांकडून खते, बियाणे खरेदीस प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात यंदा 4 लाख 75 हजार क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात दरवर्षी कपाशीची मोठय़ा प्रमाणावर लागवड होते. या पार्श्वभूमीवर कपाशीच्या बीटी वाणाची टंचाई जाणवू नये यासाठी सुमारे आठ लाख पाकिटांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत सात लाख पाकिटे उपलब्ध झाली आहेत.

शहरात शनिवारी पावसाची हजेरी

धुळे शहरात शनिवारी दुपारी पावसाने पुन्हा हजेरी लावली. दुपारी चार वाजेच्या सुमारास चारही बाजूंनी आकाशात काळे ढग भरून आले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्याच वेळी वाराही सुटल्याने पाऊस ओसरला. शहरातील साक्री रोड, मालेगाव रोड, एमआयडीसी परिसरात पावसाचा जोर अधिक होता. आग्रा रोड परिसरातील मुख्य बाजारपेठेत दहा ते पंधरा मिनिटे रिमझिम पाऊस झाला. धुळे शहर व तालुक्यात 2 जून रोजी 18 मिलिमीटर, 4 जूनला 2 तर 5 जूनला 14 मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर 5 जून रोजी जिल्ह्यातील चारही तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती.

जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामातही शेतकर्‍यांच्या हाती फारसे काही आले नाही. जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटी कापसाची लागवड केली जाते ; परंतु यंदा तापमानाचा वाढता पारा आणि पाणीटंचाईमुळे शेतकर्‍यांनी कपाशीची पेरणी केलेली नाही. तसेच जून महिन्यातही अद्याप पेरणीलायक पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांनी अजूनही पेरणीला प्रारंभ केलेला नाही. दमदार पावसानंतरच शेतकर्‍यांकडून पेरणी केली जाईल. जिल्ह्यात सुमारे 65 हजार हेक्टर वनजमिनीचे वाटप झाले आहे. या वाढीव क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच पेरणीचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यात मका, सोयाबीन, तूर, उडीद या पिकांची लागवड वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

तालुकानिहाय पाऊस

34 धुळे

23 साक्री

63 शिरपूर

50 शिंदखेडा

170 मिलिमीटर पाऊस झाला आतापर्यंत जिल्ह्यात.