आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकृत तहसीलदारास पोलिस कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक आणि शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी अटकेत असलेला संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार ईश्वर राणे यास न्यायालयाने मंगळवार (दि.2 जुलै) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेच्या महिला पदाधिकारी हेमलता हेमाडे यांनी एका तरुणीच्या सहकार्याने ईश्वर राणे याचे स्टिंग ऑपरेशनद्वारे वाचाळ चाळे उघडकीस आणले. त्यानंतर गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यास गाठून चोप दिला. त्यानंतर त्याचे कपडे उतरवून जिल्हाधिकारी कार्यालयात नग्नावस्थेत नेले. पोलिसांनी खाकी पॅन्ट आणि शर्ट देऊन त्याला संरक्षण दिले. काही वेळानंतर शहर पोलिस ठाण्यात त्याची रवानगी केली.

शिवसेनेचे आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे हेही पोलिस ठाण्यात दाखल झाले. तेथे शिवसेनेच्या नगरसेविका आणि पदाधिकार्‍यांनी हेमलता हेमाडे यांना साथ दिली. त्यानंतर हेमाडे यांनी राणे याच्याविरोधात तक्रार दिल्यामुळे विनयभंग, अश्लील चित्रफीत दाखवली या आरोपांसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात असलेल्या राणेला अटक केली. दरम्यान, त्यास शुक्रवारी न्यायालयात उभे केले असता, न्या. भगुरे यांनी त्यास मंगळवार (दि.2 जुलै)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राणे यास न्यायालयात आणले असता, तो हातरुमालाने तोंड लपविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचा चेहराही चांगलाच सुजलेला होता.