आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसाेयीचे रिक्षा, प्रवासी थांबे हटवून रस्ते करणार मोकळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात प्रमुख रस्त्यांवर एकेरी वाहतूक करणे, सिग्नल यंत्रणा सुरू करणे, वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, गैरसोयीचे रिक्षा प्रवासी वाहनांचे थांबे हटवणे या महत्वाच्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. आराखड्याचा मसुदा अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

शहरातील सगळ्याच रस्त्यावर वाहतुकीची काेंडी हाेते. किरकाेळ वस्तू विक्रेत्यांनी रस्ते अडवले आहेत. त्यातच रिक्षांचे वैध अवैध थांबेही माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. या थांब्यांना वाहतूक शाखा आरटीआे विभागाची परवानगी नाही. मात्र, कुठेही रिक्षा उभ्या केल्या जातात. त्याच ठिकाणी काही दिवसांनंतर रिक्षा थांब्यांचा फलक लागताे. हीच स्थिती प्रवासी वाहतूक करणार्‍या कालीपिली मिनिडाेअर वाहनांची आहे. शहराच्या प्रत्येक चाैकाचे महत्त्वाचे भाग या वाहनांनी अडवलेले असतात. त्यामुळे रस्त्यांवरून जाणार्‍या वाहनांनाही जागा राहत नाही. बारा पत्थर परिसराच्या एकमेव रस्त्यावर शहराच्या वाहतुकीचा भार आहे. याच रस्त्यावरून एसटी मंडळाच्या बसेस ये-जा करतात. त्याच वेळी रस्त्यांवर खुलेआम खासगी प्रवासी वाहने उभी असतात. त्यांच्यावर वाहतूक शाखेचे कर्मचारीही कारवाई करत नाहीत. पाच कंदील परिसरात वाहतुकीसाठी असलेला रस्ता विक्रेत्यांनी व्यापला आहे. तिथून दुचाकी वाहनही नीटपणे जाऊ शकत नाही.

त्यावर ताेडगा काढण्यासाठी वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी मिसाळ यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वाहतूकव्यवस्थेशी निगडित असलेल्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी वाहतुकीचा सुधारित आराखडा तयार करण्यासाठी उपविभागीय अधिकारी विठ्ठलराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने नागरिकांच्या सूचना आणि अभिप्राय मागवले होते. त्यानंतर समितीने प्रत्यक्ष पाहणी करण्यासह नागरिकांशी संवाद साधून वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आराखडा तयार केला. तो जिल्हाधिकारी मिसाळ यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे.

शहर वाहतुकीसंदर्भात तयार करण्यात आलेला आराखडा वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील. विठ्ठलराव सोनवणे, प्रांताधिकारी

या आहेत सूचना
- प्रमुख रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू करणे.
- सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून कायमस्वरूपी सुरू करणे.
- वाहतुकीच्या नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज.
- गैरसोयीचे बस, रिक्षा आणि कालीपिलीचे थांबे हटवण्याची प्रक्रिया.
- साेयीच्या ठिकाणी थांबे उभारणे.
- टोइंग व्हॅन पूर्ववत सुरू करणे.
- हातगाडीधारकांना दोनपेक्षा जास्त वेळा दंड झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणे.
- प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे.
- सुरक्षित वाहतुकीची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेणे.

अनेकांशी केली चर्चा
वाहतुकीचा आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांसह रिक्षाचालक-मालक युनियन, टॅक्सीचालक- मालक युनियन, पोलिस, महापालिका प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग, एसटी महामंडळ, शिक्षक आणि वाहतुकीशी संबंधित घटकांशी चर्चा करण्यात आली.

यापूर्वीही झाला आराखडा
तत्कालीनजिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांच्या कार्यकाळातही शहर वाहतुकीसंदर्भात आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, तो कागदावरच राहिला. त्याची अंमलबजावणी झाली असती, तर शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत झाली असती. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी िवद्यमान जिल्हाधिकारी ए.बी.मिसाळ यांनी पुढाकार घेतला असला तरीदेखील गेल्या वेळेप्रमाणे यंदाही हा आराखडा कागदावरच राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...