आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे जिल्हा परिषद प्रशासनाने चालवली झाडावर कुर्‍हाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शासन पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शतकोटी, पर्यावरण संतुलन योजनेवर लाखो रुपये खर्च करत आहे. या योजनांची अंमलबजावणी करणार्‍या जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र आपल्याच आवारात असलेल्या एका निंबाच्या झाडावर कुर्‍हाड चालविली. वनसंरक्षण दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींमधून नाराजी आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या आवारात प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस 50 ते 60 वर्षांपूर्वीचे एक मोठे निंबाचे झाड होते. जिल्हा परिषद प्रशासनाकडून रविवारी (दि.21) ते तोडण्यात आले. वृक्ष तोडण्यापूर्वी त्याच्या धोकादायक फांद्या तोडून ते कसे जगविता येईल, यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती न घेता त्यावर कुर्‍हाड चालविण्यात आली. 50 ते 60 वर्षांपूर्वीचे हे झाड तोडल्यामुळे निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. झाड संपूर्ण बुंध्यापासून तोडण्यात आले आहे. झाडाच्या वरच्या बाजूच्या फांदय़ा कोरड्या झाल्या होत्या. त्याला पाने फुटत नसल्याने ते कोरडे झाल्याचे सांगत संपूर्ण झाडावरच कुर्‍हाड चालविण्यात आली. तथापि, वन विभागाचे अधिकारी किंवा पर्यावरणवादी संस्थेशी संपर्क साधून त्या झाडाचे संवर्धन करणे शक्य आहे किंवा नाही याचा सल्ला घेतला असता तर झाडाला वाचविणे शक्य होते. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने तसे न करता थेट झाडच तोडण्याचा आततायी निर्णय घेतला. गुजरातसह अनेक राज्यांमध्ये मोठमोठे वृक्ष मुळापासून काढून ते दुसरीकडे जसेच्या तसे लावण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तसेच कोरड्या होणार्‍या आणि धोकादायक फांद्या तोडून झाड वाचविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर या झाडाचे पुनरुज्जीवन करणे शक्य होते. झाड वाळत असताना प्रशासनाने त्याच्यावर उपचार करून संवर्धन करणे गरजेचे होते.