आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhuleite Sagar Galade Form Chess Board Which Occupied On Nail

धुळ्याच्या सागर गलाडेने साकारला नखावर मावणारा चेस बोर्ड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - ‘हा छंद जीवाला लावी पिसे...’ असे जे काही म्हटले जाते ते खरे आहे. कधीकधी छंदाने माणूस इतका झपाटून जातो की त्यातून अफलातून अशी कलाकृती तयार होते. धुळ्यातील सागर गलांडे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने छंदातूनच चिमुकला 12 बाय 12 एमएमचा चेस बोर्ड तयार केला आहे. विशेष म्हणजे विश्वविक्रम नोंदविण्यासाठी त्याची तयारीही सुरू आहे.


सागरने सांगितले की, काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द मनाशी असायची. त्याच ध्येयातून या चेस बोर्डची निर्मिती झाली आहे. अंगठ्याच्या नखावर मावेल इतक्या लहान आकाराचा हा चेस बोर्ड आहे. त्यावर खेळण्यासाठी सूक्ष्म असे प्यादे, वजीर, हत्ती, उंट, घोडा तयार करण्यात आले आहेत.


एकूण 32 सोंगट्यांमधील सर्वात लहान आकार प्याद्याचा आहे. काळ्या-पांढ-या अशा 16 सैनिकांचा प्रत्येकी आकार 1.5 एमएम आहे. तर राजाचा आकार सर्वात मोठा म्हणजे 5 एमएम एवढा आहे. बोटांच्या चिमटीत मावतील एवढा 32 सोंगट्यांचा आकार आहे. या सर्व सोंगट्या पेन्सिलीत असलेल्या काळ्या-पांढ-या शिशापासून तयार करण्यात आल्या आहेत. केवळ ब्लेडच्या मदतीने त्या तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी घोड्याच्या आकाराची सोंगटी तयार करताना कष्ट करावे लागले.हा सूक्ष्म बुद्धिबळपट सागरने एका लाकडी ठोकळ्यावर चिकटवला आहे.
या बोर्डवर केवळ सागरच या चिमुकल्या सोंगट्या मांडू शकतो. आपल्या या कामाचे सर्व श्रेय तो आपल्या आई-वडिलांना देतो. विश्वविक्रम करण्यासाठी त्याची धडपड सुरू असून, नक्कीच या चिमुकल्या चेस बोर्डची दखल घेतली जाईल, याबाबत त्याला पूर्ण विश्वास आहे. त्याचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.


कामगिरीची घेतली दखल
हा आगळावेगळा छंद आशिया वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंदवला जाईल, अशी शक्यता आहे. इंटरनेटवरून सागरने त्याचा फॉर्म भरून माहिती पाठविली आहे. या विक्रमाची नोंद करणा-या संबंधितांनी त्याची दखल घेत काही आवश्यक कागदपत्रे, सूक्ष्म बुद्धिबळपट तयार करतानाचे व्हीडीओ शूटिंग, फोटो आदी माहिती मागविली असल्याचे सागरने सांगितले.


कलाकुसरीसाठी लागला महिना
सूक्ष्म स्वरूपातील बुद्धिबळपट आणि सोंगट्या तयार करण्यासाठी सागरला एक महिना लागला. त्यानंतर दि.10 नोव्हेंबर 2012 रोजी त्याचा हा छंद पूर्ण झाला आहे.