आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील चोरट्यांचे टार्गेट आता इनोव्हा कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहर परिसरातून इनोव्हा कार चोरीच्या सातत्याने घडणार्‍या घटनांची मालिका नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे या चोर्‍यांमागे टोळके असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कार चोरीच्या घटनांच्या तपास करण्यासाठी धुळे पोलिस आता नाशिक, जळगाव पोलिसांची मदत घेणार आहेत.

गेल्या तीन महिन्यांत धुळे परिसरातून चार इनोव्हा कार चोरीस गेल्या आहेत. त्यापैकी मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन तर धुळे शहर आणि आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक कार चोरीस गेली आहे. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा छडा लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. विशेष म्हणजे सर्व घटनांमध्ये कथित प्रवाशाने कार लांबविल्याचे उघड झाले असून, सर्व कार चोरीच्या कार्यपद्धतीत साम्य आहे. गेल्या आठवड्यात मुंबई-आग्रा महामार्गावर लळिंगच्या टोल नाक्याजवळून अशाच पद्धतीने एक इनोव्हा कार लांबविण्यात आली होती. त्यानंतर मोहाडी पोलिसांनी या चोरीच्या तपासाला सुरुवात केली; परंतु त्यांना अद्यापही संशयित मिळून आलेले नाहीत. इनोव्हा कारमध्ये प्रवासी बनून बसणे, विशिष्ट ठिकाणी कार थांबवून ती लांबविणे आदी प्रकार शेजारील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही घडले आहेत. त्यामुळे इनोव्हा कार चोरी मागे टोळके असण्याचा संशय आहे. या टोळक्याच्या शोधासाठी धुळे पोलिस आता नाशिक व जळगाव पोलिसांची मदत घेणार आहेत. या टोळीतील एक जरी संशयित जाळयात आला तरी सर्व टोळक्याला गजाआड करणे पोलिस प्रशासनाला सोपे होणार असल्याची स्थिती आहे.

सीसीटीव्हीची मदत
धुळयासह शेजारील जिल्ह्यातही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिस आता टोल नाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फुटेजमध्ये लांबविलेली कार आणि त्यात बसलेल्या कथित प्रवाशाचा चेहरा आढळल्यास पोलिसांना मदत होणार आहे.

सिमकार्ड कर्नाटकचे
गेल्या आठवड्यात लळिंगजवळ कमलेशकुमार माली या चालकाला लोटून इनोव्हा कार लांबविण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी मोहाडी पोलिसांचे पथक मुंबईला जाऊन आले ; परंतु संशयित मिळून आलेला नाही. याशिवाय वाहनमालक किरण शेवाळे यांच्या मोबाइलवर आलेल्या मोबाइल कॉलची चौकशी केली असता हे सिमकार्ड कर्नाटकातील असल्याचे उघड झाले आहे. मुंबईतून वाहनात बसल्यावर कथित प्रवाशाने लागलीच मोबाइल बंद करून सिमकार्ड फेकून दिले. तपासादरम्यान पोलिसांनी या सिमकार्डचे लोके शन घेण्याचा प्रयत्न केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.