आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने सत्तेवर आल्यास उड्डाणपूल, नगरपालिका शाळांच्या नवीन इमारतींचे बांधकाम, 100 टक्के रस्त्यांचे डांबरीकरण, तापी काठावर मिनी एस्सेल वर्ल्ड प्रकल्पाची उभारणी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रवेशद्वाराची निर्मिती अशी विकासकामे करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून शहरवासीयांना दिले होते. मात्र, निर्विवाद सत्ता मिळून दोन वर्षांचा कालावधी लोटला गेला तरी आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने राष्ट्रवादीचा हा जाहीरनामा अद्यापही कागदावरच असल्याने तो वांझोटा ठरू पाहात आहे.
आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेसने येथील पालिका निवडणूक लढवली. त्यात 47 पैकी 25 जागांवर विजय मिळाल्याने निर्विवाद बहुमत मिळाले आहे. नगराध्यक्षपदाची माळ 26 डिसेंबर 2011 रोजी उमेश नेमाडे यांच्या गळ्यात टाकण्यात आली. एकात्मिक शहर विकास नगरोत्थान योजनेतून 253 कोटी रुपयांचा निधी मिळवणे, रस्ते गटारी, पथदिवे, उद्यान अत्याधुनिकीकरण, शासकीय रुग्णालयाची निर्मिती अशी विकासकामे पूर्ण करणे नेमाडेंसमोर आव्हान होते. ते पेलण्याचे प्रयत्न करण्याची वेळ असतानाच पालकमंत्री संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्यात गटतटाचे राजकारण सुरू झाल्याने शहराच्या विकास रथाला ‘मोगरी’ लागली आहे.
सत्तेचा सोपान सर करण्यासाठी जी आश्वासने राष्ट्रवादीने दिली होती, ती 26 नोव्हेंबर 2013 चा दिवस उजाडला तरी किमान 25 टक्केही पूर्ण झालेली नाहीत. नगराध्यक्ष उमेश नेमाडेंनी पदभार स्वीकारून दोन वर्षे लोटली गेली, तरीही जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांनुसार एकही उल्लेखनीय काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही, हे विशेष.
निवडणुकीत दिलेली आश्वासने
- नवोदय विद्यालयाजवळ सात एकर जागेवर शासकीय रुग्णालयाची निर्मिती करणार
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भव्य प्रवेशद्वाराची उभारणी
- तापीनदी काठावर मिनी एस्सेल वर्ल्ड, पर्यटन अन् वनौषधी विकास प्रकल्प
- शहरातील प्रत्येक वॉर्डातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि भूमिगत वीजवाहिनी
- कचर्यापासून खतनिर्मिती प्रकल्प, पालिका शाळा इमारतींचे नवीन बांधकाम
- शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल, नियमित साफसफाई
पाठपुरावा सुरू असलेली कामे
नगराध्यक्षांनी गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जलतरण तलाव उभारणे, बलबलकाशी नाल्यावर हॉकर्स झोन उभारणे, पालिकेची इमारत 10 मजली करणे, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात नवीन खेळणी बसवणे या कामांचे प्रस्ताव शासनस्तरावर पाठवले आहेत.
दखल घेण्यासारखी कामे अशी
जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढणे, मुख्य चौकात दोन हायमास्ट दिव्यांची उभारणी, ठराविक भागातील रस्त्यांची दुरुस्ती, पेव्हिअर ब्लॉक बसवणे ही कामे विद्यमान नगराध्यक्षांच्या कार्यकाळात झाली आहेत. मात्र, ही कामे दिलेल्या आश्वासनांच्या तुलनेत अतिशय तोकडी आहेत. त्यातल्या त्यात राजकीय कुरघोडी वाढल्याने मूलभूत सुविधा मिळणेही आता अवघड झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.