आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diesel Rate Hike Is India St Bus Employee Oppose

डिझेलच्या दरवाढीविरोधात एसटीचे कर्मचारी उभारणार लढा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- डिझेलच्या दरवाढीचा निर्णय रद्द करावा व 2012च्या थकबाकीसह जानेवारीच्या वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता रोखीने देऊन कामगार करार करावा, या मागणीसाठी एसटी कर्मचारी मान्यताप्राप्त संघटनेतर्फे येत्या 28 जानेवारी रोजी राज्यभर काळ्या फिती लावून निदर्शने केली जाणार आहेत.

महामंडळावर 500 कोटींचा भार
डिझेलच्या भावात नुकतीच दरवाढ झाली आहे. त्यात एसटीसाठी प्रतिलिटर 11 ते 12 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे महामंडळावर 500 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. यापूर्वीच अनेकदा दरवाढ झाल्याने एसटीच्या आर्थिक स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. आता पुन्हा नव्याने केंद्र शासनाने डिझेल दरात केलेल्या वाढीमुळे एसटीवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे एसटी कामगारांचे आर्थिक प्रश्न सुटण्यास अडथळा होणार असून, हा एक प्रकारे कामगारांवर अन्यायच आहे. कारण डिझेल दरवाढीमुळे खासगी वाहतूक वाढून महामंडळाचे उत्पन्न घटणार आहे. त्यासाठी प्रवासी कराचा दर 17.5 टक्क्यांवरून 5 टक्के खाली आणून त्या प्रमाणात सवलत दिल्यास एसटीच्या उत्पन्नावर अनुकूल परिणाम होईल.

रोखीने भत्ता देण्यास नकार
गेल्या वर्षापासून कामगार कराराचा प्रश्न रेंगाळत आहे. वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. महामंडळाने 5 ऑक्टोबरला कामगार कराराचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. संघटनेच्या आक्षेपानंतर आता अंतिम निर्णयासाठी तो मुख्यमंत्र्यांकडे पडून आहे. 5 जानेवारी 2013च्या पत्रानुसार शासनाने महामंडळाला पाठवलेल्या प्रस्तावापोटी प्रतिवर्षी 310 कोटी व एकूण 4 वर्षांसाठी 1,240 कोटी एवढा आर्थिक भार पेलण्यासाठी उत्पन्न वाढवण्याच्या मुद्यावर मान्यताप्राप्त संघटनेशी चर्चा करून अनुमती द्यावी, असेही सूचित केले आहे. सध्या वाहक-चालक करत असलेल्या कामाची वास्तव नोंद होत नाही. त्यामुळे 10 ते 12 तास काम करणार्‍या कामगारांकडून त्याव्यतिरिक्त कामवाढीची अपेक्षा करणे, हे सयुक्तिक नसल्याने संघटनेने कामवाढीस विरोध केला आहे. वेतनात समाधानकारक वाढ होणारा वेतन करार करावा म्हणून या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

डिझेलच्या दरवाढीचा फटका
डिझेलच्या दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होणार असून, कर्मचार्‍यांवर त्याचे पडसाद उमटतील. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी राज्यभर हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसेच 30 जानेवारीला दिल्ली येथे संयुक्त बैठक होऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरेल. हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, एसटी कर्मचारी संघटना