आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या सभेवर मतभिन्नतेचे सावट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आधीच महिनाभर उशिरा होत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेच्या स्थळावरून पक्षांतर्गत मतभेद उघड झाले आहेत. त्यात बैठकीला न बोलावल्याच्या कारणावरून रूसवे फुगवे उघड झाल्याने या सर्व घडामोडींचे सावट सभेपूर्वी निवळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा पार पडला. त्यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद बर्‍याच दिवस चर्चेचा विषय ठरला. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सभेकडेही बघितले जात आहे. मुंबईच्या बैठकीत ठाकरेंनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना 5 मे तारीख दिली होती. त्याच ठिकाणी पारोळा येथे सभेचे स्थळ निश्चित झाले होते. मात्र 13 रोजी जळगाव येथे झालेल्या सभेत पारोळा येथे सभेला पक्षातूनच विरोध झाला. राज ठाकरेंची सभा जळगावला झाली आहे. मुख्यमंत्री सुध्दा जळगावला येणार आहेत.

जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जळगावलाच सभा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सभेच्या स्थळावरूनच एकमत होण्यास वेळ लागल्याने तसेच जबाबदारी घेण्याच्या मुद्यावरून पदाधिकार्‍यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच दिसून आले. अखेर 4 मे रोजी सभा जळगावला घेण्याचे निश्चित झाले असले तरी पक्षांतर्गत रूसव्या फुगव्यांचे काय? असा प्रश्न शिवसेनेंतर्गत विचारला जात आहे. सभेच्या तयारीसाठी संपर्कप्रमुख विलास अवचट पुढील आठवड्यात जिल्ह्यात येत आहेत. स्थानिक पातळीवर नियोजन सुरू झाले आहे.
पदाधिकार्‍यांपुढे मोठे आव्हान
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही अशा प्रकारच्या कुरघोड्या सुरूच होत्या. परंतु राज ठाकरेंच्या दौर्‍यानिमित्त सर्वच एका व्यासपीठावर येऊन काम करताना दिसले. त्याचा परिणाम सभा यशस्वी होण्यासाठी झाला. नेमके हेच शिवसेनेतील पदाधिकार्‍यांना करावे लागणार आहे. सभा स्थळ कोणतेही असो, जबाबदारी प्रत्येकाची आहे हे समजून काम करणे गरजेचे ठरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला खान्देशातून कार्यकर्ते येणार आहेत. मनसेचा एकही आमदार नसताना त्यांनी ताकद दाखवण्याचा प्रय} केला. शिवसेनेचे खान्देशात आमदार असून नगरपालिकेमध्ये सत्ता आहे. जिल्हा परिषदेत सत्तेत वाटेकरी आहेत. त्यामुळे मनसेपेक्षा नक्कीच ताकद जास्त म्हणावी लागेल. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांसमोर मोठे आव्हान असून पक्षांतर्गत मतभेद सभेपूर्वी निवळतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजीनामा देण्याची तयारी
जिल्हा परिषद उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीला आपल्याला बोलावले नाही या कारणावरून माजी जिल्हा प्रमुखांनी विद्यमान जिल्हा प्रमुखांना टोला लगावला होता. त्यावर पक्ष कार्यालयातून सर्वांना फोन केले होते असे सांगत मी जर न्याय देऊ शकत नसेल तर जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देण्यास केव्हाही तयार असल्याचे खुले आव्हान देण्यात आले. हा एक किस्सा असला तरी अशा प्रकारचे बरेच किस्से ऐकायला येत आहेत. एखाद्या पदाधिकार्‍याला राजीनाम्याची भाषा करावी लागते यावरून पक्षांतर्गत मतभेद संघटनेच्या बांधणीवर परिणाम करणारेच आहेत.