आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात डिजिटल दरोडा, बँक ऑफ महाराष्ट्रतून 49 लाख रुपये खात्यांवर वळवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील 13 जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर डिजिटल दराेडा टाकला. बँकेच्या पुल अकाउंटमधील 49 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये परस्पर वळवून घेतले. याप्रकरणी काल (बुधवारी) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई, औरंगाबाद, नाशिकनंतर हे लोन जळगावपर्यंत येऊन पोहचले आहे. जळगावातील नवीपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये देखील हा प्रकार घडला आहे. यूपीआय अॅपमध्ये मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून खात्यावर पैसे नसताना एका दिवसाला लाख रुपयांपर्यंत मागणी करण्यात येत हाेती. याचा गैरफायदा घेत येथील जितेंद्र मारुती रिंधे याने मेहरूण भागात राहणाऱ्या सात-आठ जणांच्या नावाने खाते सुरू केले. काहींचे बंद पडलेल्या खात्यांचाही त्याने वापर करून घेतला. ज्यांच्या खात्यांचा वापर केला. त्यातील, काहीजण अशिक्षितही आहेत. विविध खात्यांचा वापर करून 13 जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुल अकाउंटमधील 48 लाख 94 हजार 482 रुपये परस्पर वळते करून घेतले आहेत. पैसे विड्रॉल झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. सुरुवातीला बँकेने आपल्या पातळीवर तपास करणे सुरू केले. तपासाअंती त्यांना 13 जणांच्या खात्यांवर गैरप्रकारे पैसे जमा झाल्याचे तसेच संबंधितांनी जमा झालेले पैसे खात्यातून काढून घेतल्याचे लक्षात आले. त्यानुसार बुधवारी बँकेच्या अधिकारी छाया गिरीश गरुडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर तपास करीत आहेत.

रिंधेच मास्टरमाइंड असल्याचा संशय
बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी करून शहर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी बोलावले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रिंधे याने सर्वप्रथम सहा जणांना पैसे मिळवून देण्याचे आमिष दिले होते. त्यानंतर त्याने सात-आठ जणांचे मोबाइल सिमकार्ड, पासबुकही स्वत:कडे ठेवले होते. ज्या व्यक्तीसाठी तो विनंती करायचा ते सिमकार्ड देखील रिंधेकडेच असायचे. यामुळे रिंधे हाच मागणीकर्ता लाभार्थ्याची भूमिका बजावत होता. खात्यांमध्ये वळवलेली रक्कमदेखील रिंधेनेच स्वत:जवळ ठेऊन घेतल्याची माहिती काहींनी पोलिसांना दिली आहे. रिंधे याच्याशिवाय या गुन्ह्यात अकोला, मुक्ताईनगर भागातील काही लोकांनीही अशाच प्रकारे पैसे काढून घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा:
सिराजुद्दीन शफीउद्दीन सय्यद, शेख सलीम शेख मुतूर्झा, शहेनाजबी जाकीर सय्यद, मुनाजीम सय्यद शफीउद्दीन सय्यद, शमशोद्दीन करिमोद्दीन सय्यद, रफीक समशेरोद्दीन सय्यद, जितेंद्र मारुती रिंधे, आतामोहम्मद खान, राजेंद्र भानुदास बारडे, विजय वसंतराव मुरकुळे, गोपाळ गोविंदराव वानखेडे, सुनील केशवराव पंडागळे, राजेंद्र जनार्दन बडुरखेल

> या गुन्ह्यातआधी चौकशी करून घेतली. संबंधितांनी नियोजनबद्धरीत्या बँकेच्या यूपीआय अॅपचा गैरवापर केल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-प्रदीप ठाकूर, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे
बातम्या आणखी आहेत...