आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षा महोत्सवाला सिद्धी सहायक साधनेने झाला प्रारंभ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जैन धर्मासाठी आयुष्य समर्पित करणा-या मेहता परिवाराच्या जैन भगवती दीक्षा महोत्सवाला मंगळवारी सिद्धी सहायक साधन सोहळ्याने सुरुवात झाली. ब्यावर (राजस्थान) येथील खिवसरा परिवारातील आई-वडील आणि कन्या अशा तिघांनी येत्या सात वर्षांत जैन भगवती दीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. हे या सोहळ्याचे सर्वात मोठे दान ठरले.
ब्यावर येथील रहिवासी सुदर्शन मेहता, सुचिता मेहता व अनेकांत मेहता यांनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना गुरुवारी आचार्यप्रवर ज्ञानचंद्र महाराज यांच्या उपस्थितीत दीक्षा दिली जाणार आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता नवीपेठेतील महावीर ज्वेलर्स येथून सिद्धी सहायक साधन सोहळ्यास सुरुवात झाली. दीक्षा घेतल्यानंतर वापरावयाच्या विविध साहित्य-साधनांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. श्री. अरिहंतमार्गी जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय ललवाणी यांच्या परिवारातील सदस्यांनी साहित्य-साधनांची विधिवत पूजा करून ते डोक्यावर धारण करून खान्देश सेंट्रलमधील दीक्षास्थळापर्यंत आणले. या साहित्य-साधनांमागे वरघोड्यावर दीक्षार्थी पारंपरिक वस्त्रांमध्ये विराजमान झाले होते. महावीर ज्वेलर्स, जयप्रकाश नारायण चौक, जिल्हा बॅँक, महापालिका इमारत, नेहरू चौकमार्गे शोभायात्रा निघाली. नरेश खिवसरा व नीता खिवसरा यांनी येत्या सात वर्षांत तर आस्था खिवसरा या लहान मुलीने येत्या पाच वर्षांत दीक्षा घेण्याचे सर्वात मोठे दान दिले. या वेळी समाजबांधवांनी विविध दान घोषित केले. कार्यक्रमास श्री.अरिहंतमार्गी जैन राष्ट्रीय महासंघ, दिल्ली व स्थानिक जळगाव शाखा, स्व.रूपचंद ललवाणी चॅरिटेबल ट्रस्ट, महावीर ज्वेलर्स, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व चंद्रा कन्स्ट्रक्शन यांचे सहकार्य मिळत आहे.
आज वरघोडा शोभायात्रा - बुधवारी सकाळी साडेआठ वाजता दीक्षार्थी मेहता परिवाराची नवीपेठेतील महावीर ज्वेलर्स येथून वरघोडा शोभायात्रा काढण्यात येणार आहे. साहित्य शोभायात्रा मार्गानेच ही शोभायात्रा निघेल. दुपारी दोन वाजता मेहता परिवाराचा अभिनंदन सोहळा आणि ‘अठरा पापों की संवेदना’ करण्यात येईल.
काय आहे वरघोडा ? - वरघोडा हा जैन धर्मातील दीक्षार्थींसाठी सन्मान व आदरभाव व्यक्त करण्याचा कार्यक्रम होय. वरघोडा म्हणजे पारमार्थिक जीवनाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण आणि धार्मिक अधिष्ठानाने होण्याचे प्रतीक आहे. दीक्षार्थींची घोड्यावरून मिरवणूक काढून सामाजिक व धार्मिक विधी पार पाडले जातात. तसेच दीक्षार्थींचा सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे मेंदी विधी, धार्मिक संस्कार, भक्तिगीते, प्रवचन आदी झाल्यानंतर गुरुदेव, साधू व साध्वींच्या उपस्थितीत दीक्षा दिली जाते. या सोहळ्याची उत्सुकता आहे.