आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतांच्या उपस्थितीत दीक्षा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जैन धर्मात अनन्य साधारण महत्त्व असलेली भगवती दीक्षा सुदर्शन मेहता, शुचिता मेहता आणि अनेकान्त मेहता यांनी गुरुवारी घेतली. समाजातील सर्व सुख-दु:ख, नाते, व्यवहार सर्व गोष्टींचा त्याग करून तीनही मुमुक्षुंनी हजारो समाजबांधव, संतगणांच्या साक्षीने दीक्षा स्वीकारली. ‘सिव्हिल डेथ’ म्हणजेच जिवंतपणी मरण अशा प्रकारची ही दीक्षा आहे. दीक्षा घेतल्यानंतर एका पवित्र जन्माची सुरुवात होते असे मानले जाते. गेल्या दोन दिवसापासून खान्देश सेंट्रल परिसरात सुरू असलेल्या या दीक्षा समारंभात गुरुवारी प्रमुख कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्ताने सकाळी आठ वाजता महावीर ज्वेलर्स ते खान्देश सेंट्रलपर्यंत दीक्षार्थींना बग्गीत बसवून सवाद्य ‘वरघोडा’ मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दीक्षास्थळी दीक्षार्थींचे मुंडण करण्यात आले व त्यांना परिधान करावयाच्या सफेद वस्त्रांना उपस्थितांचे हात लावून आशीर्वाद देण्यात आले. कार्यक्रमात खासदार ईश्वरलाल जैन, आर.सी.बाफना, दलिचंद जैन, अशोक जैन, महापौर सदाशिव ढेकळे, रमेश जैन आदी उपस्थित होते. नवदीक्षितांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थितांनी एक दुर्गुण सोडण्याची शपथ घेतली. मंगलपठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
ज्ञानचंद्र महाराज यांनी घेतली परवानगी- ज्ञानचंद्र महाराज यांनी दीक्षा देण्यापूर्वी तिघां दीक्षार्थींकडून लेखी परवानगी घेतली होती. परंतु प्रत्यक्ष दीक्षा देताना दीक्षार्थींच्या परिवारातील सदस्य, समाजातील प्रतिष्ठित नागरिक व उपस्थित समाजबांधवांची परवानगी घेतली. या वेळी सर्वांनी हात वर करून संमती दर्शवली आणि दीक्षा समारंभाला सुरुवात झाली.
भक्तीमय वातावरणात भव्य सोहळा- जमलेल्या हजारो समाजबांधवांनी एकसाथ भगवान महावीरांची आराधना केली. तसेच रुपेश वोरा आणि सहका-यांनी ‘गुरुवर हमको दिजीए जनम जनम का साथ’, ‘गुरुवर के चरणो मे समर्पण है’, ‘तुमने भगवान एक वर आपीदे’ ही सुमधुर भजने गाऊन भक्तीमय वातावरण निर्माण केले. उपस्थितांनी भजनांना साथसंगत दिली.
नामकरण सोहळा- दीक्षा दिल्यानंतर दीक्षार्थींचे नामकरण करण्यात आले. सुदर्शन मेहता यांचे आर्या सुदर्शन मुनी, शुचिता मेहता यांचे आर्या सिद्धिश्री साध्वी आणि अनेकान्त मेहता याचे बालब्रम्हचारी आर्या गितीर्थ मुनी असे नामकरण करण्यात आले. नामकरणाच्या फलकांचे अनावरण समाजबांधवांच्या हस्ते करण्यात आले.
पाच महाव्रताचे जीवन-दीक्षा घेतल्यानंतर सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अहिंसा या महाव्रतांचे पालन करावे लागते. कधीही खोटे बोलू नये, कोणत्याच जीवाची हिंसा करू नये, विजेवर चालणा-या वस्तूंचा वापर करू नये, वनस्पती, झाडे, फळे यांना स्पर्श करू नये, सूर्यास्तानंतर एक थेंबही पाणी ग्रहण करू नये, बह्मचर्य पाळावे आदी प्रकारचे संयम आयुष्यभर पाळावे लागतात.
गुरुवारी बडी दीक्षा-भगवती दीक्षा घेतल्यानंतर बडी दीक्षा घ्यावी लागते. या दीक्षेच्यावेळी दीक्षार्थींना साधू जीवनाची माहिती दिली जाते. तसेच भिक्षुक जीवन जगत असतानाचे नियम सांगितले जातात. मेहता परिवारातील दीक्षार्थींची बडी दीक्षा 26 जानेवारी रोजी दाढीवाला बंगला परिसरात होणार आहे. या दिवसापासून ते संसारातून मुक्त होतील.
अशी दिली दीक्षा - दीक्षास्थळी उपस्थितांच्या परवानगीने दीक्षार्थींना पांढरे कपडे परिधान करून व्यासपीठावर आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावरील उर्वरीत केस हाताने उपटुन त्यांच्याकडून नमोकार मंत्र वदविण्यात आला. ज्ञानचंद्र महाराज यांनी प्रत्येकाला साधू जीवनाचे महत्त्व सांगून दीक्षा मागण्यासाठी झोळी व संयमध्वज दिला.