आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात भुसावळ रेल्वे यार्डातून कोळशाची वाहतूक केली जाते. तर विस्तारित प्रकल्पासाठी वरणगावकडून नवीन लोहमार्ग तयार करण्यात आला आहे. रूळ जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने येत्या पंधरवड्यात नवीन मार्गाने विस्तारित प्रकल्पात कोळसा मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोळशाचा प्रश्न सुटणार असल्याने वीजनिर्मितीत वाढ होईल.
दीपनगरच्या जुन्या वीजनिर्मिती केंद्राला रेल्वे यार्डातून स्वतंत्र रेल्वेलाइनद्वारे कोळसा पुरवला जातो. मात्र, यार्डात वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढल्याने रेल्वे प्रशासनाने दिवसाला केवळ तीन रॅक पाठविण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, नवीन प्रकल्पाच्या उभारणीनंतर रेल्वेमार्गासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली. वाहतुकीसाठी सुलभ असल्याने वरणगावमार्गे कोळसा आणण्याचे ठरविण्यात आले. यासाठी सध्या वापरात नसलेल्या वरणगाव आयुध निर्माणीच्या रेल्वेलाइनचा वापर करण्यात आला. तर फुलगावपासून स्वतंत्र नवीन रेल्वेलाइन वाढवण्यात आली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून वरणगाव रेल्वे स्थानकावर सिग्नल जोडणीचे काम थांबविण्यात आल्याने कोळसा लोहमार्गाचे काम रखडले होते. 13 मार्चला रेल्वे प्रशासनाने मुंबई-हावडा लोहमार्गावर वरणगावजवळ रेल्वेगाड्या मंदगतीने चालवून काम उरकले आहे. दरम्यान, दीपनगर केंद्राचे मुख्य अभियंता मनोहर गोडवे, उपमुख्य अभियंता एल.बी.चौधरी यांनी कामाची पाहणी केली. रेल्वे अधिकार्यांची भेट घेऊन या मार्गावरून त्वरित वाहतूक सुरळीत करण्याची विनंती करण्यात आली आहे. रेल्वेरूळांचे काम 100 टक्के पूर्ण झाल्याने कोळसा वाहतूक सुरू होण्याच्या हालचाली आहेत.
महामार्गावर उड्डाणपूल
वरणगाव-फुलगाव दरम्यान दीपनगर प्रकल्पाची रेल्वेलाइन राष्ट्रीय महामार्गाला क्रॉस करून जाते. महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. महाजनको प्रशासन यासाठी महामार्ग विभागाला निधीचा पुरवठा करणार आहे. मात्र, महामार्ग चौपदरीकरणापर्यंत हे काम पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे. महामार्गावर सध्या रेल्वेगेट बसविण्यात आले असून प्रत्यक्ष कोळसा वाहतूक सुरू झाल्यावर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढतील. दिवसाला किमान 10 रॅक कोळसा येणार असल्याने 24 तासात महामार्गावरील गेट 10 वेळा बंद केले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.