आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipnagar Electricity Plant Fire Security Demand Bhusawal

दीपनगरला आग नियंत्रणासाठी हवी प्रभावी, दक्ष यंत्रणा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वीज निर्मिती प्रक्रियेदरम्यान आगी लागण्याचे प्रमाण अधिक आहे. वीज निर्मिती केंद्राच्या आवारात सन 2011 या वर्षांत तब्बल 54 वेळा आगी लागल्या. तर परिसरात लागलेल्या 8 आगींवरही अग्निशामक दलाने नियंत्रण मिळविले,असे असताना केवळ दोन अग्निशामक गाड्यांवर वीज केंद्र आगीवर नियंत्रण कसे मिळवू शकते, हा संशोधनाचा विषय झाला आहे.
महाजनकोच्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रातून दोन संचांच्या माध्यमातून सरासरी 360 मेगावॅट वीज निर्मिती होते. वीज निर्मिती प्रक्रियेत कोळसा जाळला जात असल्याने तसेच शॉर्टसर्किटमुळे आगी लागण्याचे प्रमाण अधिक असते. यासाठी महाजनकोने स्वतंत्रपणे अग्निशामक विभागाची निर्मिती केली आहे. आपत्कालिन असलेल्या या विभागाला आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ दोन वाहने मिळालेली आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी या विभागात तीन वाहने होती. सध्या मात्र एक वाहन नादुरूस्त आहे. या वाहनावर कागदोपत्री खर्च करण्यात आला असला तरी ते प्रत्यक्षात काम करीत नसल्याने या विभागात काम करणा-या कर्मचा-यांना त्रास सहन करावा लागत आहे. वीज निर्मिती केंद्रासह भुसावळ परिसरात लागलेल्या आठ आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. कामाच्या तुलनेत महाजनकोकडे कर्मचा-यांची कमतरता आहे. सध्या चार कनिष्ठ अग्निशामक अधिकारी, सहा चालक आणि 14 फायरमन असे 24 कर्मचारी आहेत. तर चार जण कंत्राटी तत्वावर आहेत.
सरासरी आठवड्याला एक आग - वीज निर्मिती केंद्रात वर्षभराच्या 52 आठवड्यांपैकी 54 वेळा आगी लागण्याच्या घटना घडल्या म्हणजे सरासरी आठवड्याला एकदा आग लागली. वीज निर्मिती केंद्रात वेळोवेळी होणा-या अपघातात कर्मचा-यांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
दूरध्वनी वर्षापासून बंद - दीपनगरच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील अग्निशामक विभागातील 645206 हा टाटा इंडिकॉमचा स्वतंत्र क्रमांक देण्यात आला होता. मात्र,गेल्या सहा महिन्यांपासून हा फोन बंद करण्यात आला आहे.
सहायक फायरमनचे पद रिक्तच - अग्निशामक विभागातील सहायक फायरमन हे पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहे. आगामी उन्हाळ्यात तापमान अधिक असल्यास आग लागण्याचे प्रमाण वाढते. अग्निशामक विभागात सहायक फायरमन पदावर नियुक्ती होणे गरजेचे आहे.
कर्मचा-यांची कमतरता आहेच - दीपनगर औष्णिक वीज निर्मितीच्या अग्निशामक विभागात कर्मचा-यांची कमतरता आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्मचा-यांकडून सचोटीने प्रयत्न होतो. एक वाहन नादुरुस्त असल्याची नोंद दररोजच्या लॉंग बुकमध्ये होते. - रवी व्यंकटस्वामी, कनिष्ठ अग्निशमन अधिकारी