आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकाचक शहरात पुन्हा घाणीचे ढीग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘सहज मिळालेल्या गोष्टीचे महत्त्व मनुष्याला कळत नसते’ या उक्तीप्रमाणे जळगावकरांना सहज मिळालेल्या स्वच्छतेचे मोल कळले नाही. रविवारी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सेवकांनी स्वच्छता माेहीम राबवत अवघे शहर चकाचक केले हाेते. मात्र, एका रात्रीतून म्हणजेच सोमवारी स्वच्छ केलेल्या जागांवर पुन्हा एकदा अस्ताव्यस्त कचरा टाकून या माेहिमेचे महत्त्वच संपवून टाकले असून शहरात सर्वत्र अस्वच्छता दिसत अाहे.
जळगावकरांना स्वच्छतेची नाही कदर
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची धडपड धुळीस श्री सेवकांनी स्वच्छ केलेल्या जागेवर साचले माेठे उकिरडे कुंड्यांमध्ये टाकता नागरिकांनी रस्त्यावरच इतस्त फेकला कचरा

प्रतिसादाएेवजी कचरा वाढल्याने श्री सेवकांनी केलेले श्रम व्यर्थच
डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या हजार २०० ‘श्री’ सेवकांनी माेठ्या मेहनतीने शहरातील ६६१ टन कचरा चार तासांत उचलून त्याची विल्हेवाट लावली हाेती. त्यामुळे रविवारी संपूर्ण शहराला झळाळी आली हाेती. महापालिकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होणे अशक्य आहे. मात्र, दारोदारी जाऊन ‘श्री’सेवकांनी नि:स्वार्थ भावनेने कचरा उचलला, रस्ते झाडले, कचराकुंड्यांमधील कचरा ट्रॅक्टर डंपरच्या साह्याने वाहून नेला. तसेच शासकीय कार्यालयांच्या भिंतीदेखील पुसल्या. हे सर्व चित्र जळगावकरांनी रविवारी आश्चर्याने पाहिले. काहींनी ‘श्री’सेवकांचे कौतुक केले, तर काहींनी कचरा करण्याचा मनोमन संकल्पही केला. मात्र, कोणी संकल्प केला आणि कोणी स्वच्छतेची कदर केली नाही, ते सोमवारी दिसून आले.

या ठिकाणी साचला कचरा
सोमवारी शहरातील दाणाबाजार, आर.आर.शाळेचा परिसर, आकाशवाणी चौकातील काही रुग्णालयांचा परिसर, महापालिका, गोलाणी मार्केटच्या मागील बाजू, सुभाष चौक, चौबे मार्केट, शिवाजीनगर, नवीपेठ आदी भागांमध्ये पुन्हा कचरा साचलेला दिसून अाला. हा कचरा परिसरातील नागरिकांनीच तेथे टाकला आहे. त्यामुळे हा कचरा उचलण्यासाठी पुन्हा एखाद्या सामाजिक संस्थेच्या माेहिमेची वाट पाहावी लागणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

व्यापारी संकुलांमध्येही कचरा
‘श्री’सेवकांनी शहरातील व्यापारी संकुलांमध्ये कित्येक दिवसांपासून साचलेला कचराही उचलला होता; परंतु सोमवारी मार्केट सुरू झाल्यापासून पुन्हा एकदा कचरा होण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत बऱ्याच प्रमाणात कचरा तेथील परिसरात साचला होता. आता हा कचरा दिवसेंदिवस साचत जाऊन त्याचे ढीग वाढत राहतील. दुकानदारांनी अापल्या दुकानाबाहेर किंवा काही दुकानांनी मिळून एकत्रितपणे कचराकुंडी ठेवली असती, तर ही समस्या निर्माण झाली नसती. मात्र, याबाबत कुणीही पुढाकार घेतलेला दिसून आला नाही. याउलट ज्या ठिकाणी महापालिकेने मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या ठेवल्या आहेत, त्या कुंड्यांमध्ये कचरा टाकता नागरिकांनी आजूबाजूला कचरा फेकला असल्याचे दिसून आला. त्यामुळे स्वच्छतेचा स्वत: संकल्प केल्याशिवाय चित्र बदलणार नाही, हे मात्र खरे.

स्वच्छता अभियानाची ‘क्रेझ’ कमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाने आपापल्या परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन केले होते. सुरुवातीला या अभियानात सहभागी होण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष, शाळा महाविद्यालयांनी पुढाकार घेतला. तसेच हातात झाडू घेऊन अन् सेल्फी काढून अनेकांनी सोशल मीडियावर त्याचे फाेटाे व्हायरल केले हाेते; परंतु आता स्वच्छता अभियानाची ‘क्रेझ’ कमी झाल्याचे दिसून येत असून, संपूर्ण शहरात अस्वच्छतेचे चित्र दिसत आहे. डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता माेहिमेचा आदर्श घेण्याऐवजी नागरिकांनी साधी जागरूकताही दाखवल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.

बातम्या आणखी आहेत...